
शिंदे-फडणवीस यांच्या डोक्याला ताप
अब्दुल सत्तार यांची पुन्हा जीभ घसरली; राष्ट्रवादीचे राज्यभरात आंदोलन
प्रशांत बारसिंग
मुंबई : राज्यात मुख्यमंत्री(Chief Minister) एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री(Deputy Chief Minister) देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर येऊन तीन महिने होत असतानाच सरकारमधील मंत्री आणि नेते विशेषत: शिंदे गटाच्या मंत्र्यांची वादग्रस्त विधाने करून नंतर माफी मागण्याचा सपाटा लावल्याने शेवटी शिंदे— फडणवीस यांची डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राष्ट्रवादीने आज अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानासमोर आणि राज्यभरात आंदोलन केले. शेवटी अब्दुल सत्तार यांनी माफी मागितली असली, तरी राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत.
माजी मंत्री तथा ज्येष्ठ मंत्री रामदास कदम(Ramdas Kadam) यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यापासून प्रसारमाध्यमांना बोलत असताना ते वारंवार आक्षेपार्ह विधाने करीत आहेत. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर रामदास कदम आक्षेपार्ह शब्दात टीका करीत आहेत. रामदास कदम यांच्या बोलण्यावर अनेकांनी आक्षेप घेतल्यावर त्यांनी रश्मी ठाकरे यांची जाहीर माफी मागितली. हाच प्रकार सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला. काही दिवसांपूर्वी पुण्यात ससून रुग्णालयातील डॉक्टरांना सूचना करताना त्यांनी “हाफकिन” या व्याक्तिकडून औषधे न घेण्याचा सल्ला दिला. यावर हाफकिन हा कोणी व्यक्ती नसून, संस्था असल्यामुळे मंत्र्यांना सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागले. काल त्यांनी मराठा आरक्षण संदर्भात विधान करताना समाजाच्या भावना दुखावतील अशा शब्दांचा वापर केल्या. यावर चोहोबाजूंनी टीकेचा भडिमार सुरू झाल्यावर त्यांनी जाहीर माफीनामा(apology) पेश केला.
गेल्या महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रधानमंत्री शेतकरी अनुदान योजनेच्या धर्तीवर काही नवीन योजना आखता येतील का?, यावर साधक—बाधक चर्चा झाली. कृषिमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी हा विषय प्रसारमाध्यमात सांगितला. यावर देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले होते.
उध्दव ठाकरे सरकारने राज्यातील मेगा स्टोर आणि मॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला भाजपने कडाडून विरोध करीत ठाकरे सरकार दारुवाल्यांचे सरकार असल्याच्या टीकेचा भडिमार केला होता. आता शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी ही योजना शेतकऱ्यांसाठी कशी चांगली आहे, याबाबत विधाने केली होती. नंतर या दोघांना वरिष्ठांनी समज दिल्यावर त्यांनी आपल्या विधानावर सारवासारव केली होती. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar) यांनी देखील राजकीय विधाने करताना शरद पवार किंवा ठाकरे कुटुंबांच्या भावना दुखावतील अशी टिपण्णी करून नंतर माफी मागितली होती.

नेते आणि विधाने
रामदास कदम : उध्दव, आदित्य आणि रश्मी ठाकरे यांच्यावर वक्तव्य
दीपक केसरकर : एकनाथ शिंदेंना सलाईन लावल्यावर ते दुसऱ्या दिवशी काम करतात, असे म्हणाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबतही विधान केले होते.
तानाजी सावंत : हाफकिन माणूस आणि मराठा आरक्षणाची खाज अशा शब्दांचा वापर.
अब्दुल सत्तार : केंद्राची योजना राज्यात राबविणार, असे विधान करताच देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात झापले. सुप्रिया सुळे यांच्याबाबत आज वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाविकास आघाडीने राज्यभरात आंदोलने केली.
अब्दुल सत्तार आणि शंभूराज देसाई : मॉलमध्ये वाईन विक्रीवर वक्तव्य केले, मात्र नंतर ते मागे घेतले.
गुलाबराव पाटील : शिवसेना उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे यांचा “नटी” असा उल्लेख केल्याने राज्यभर संताप.
आमदार संतोष बांगर : हिंगोली जिल्ह्यात कृषी अधिकारी यांना दमदाटी आणि गेल्या आठवड्यात मंत्रालय सुरक्षासाठी असलेल्या पोलीस कर्मचारी यांच्यासोबत बाचाबाची.
मराठा समाजाचा अवमान करणाऱ्या तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, तसेच अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी म्हटले आहे.
चोवीस तासाच्या आत सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, असे राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ता(NCP Spokesperson) महेश तपासे यांनी म्हटले.


