
मुंबई : घाटकोपर पश्चिम येथील खोत गल्लीत काल सकाळपासून दुपारपर्यंत पोलिसांनी फेरीवाल्यांवर कारवाई केल्यानंतर आज पुन्हा याच भागातील अनेक वर्दळीच्या रस्त्यावर पालिकेने धडक कारवाई केली. त्यात तब्बल ३ ट्रक वस्तू जप्त केल्याची माहिती पालिकेच्या एन विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय सोनवणे यांनी सांगितले.संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत घाटकोपर पश्चिमेकडील रेल्वे स्थानक रस्ता परिसर, श्रद्धानंद रोड, महात्मा गांधी रोड, खोत गल्ली या रस्त्यांवरील गेल्या अनेक वर्षांपासून बस्तान बसवलेल्या फेरीवाल्यांवर धडक कारवाई करत ३ ट्रक माल ताब्यात घेण्यात आला. त्यामुळे कालच्या पोलिसांच्या कारवाईपेक्षा आजची पालिकेची कारवाई ही चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान काल पोलिसांच्या झालेल्या कारवाईत एकही पालिका कर्मचारी आणि अधिकारी नव्हता. त्यामुळे त्याबाबत प्रश्न निर्माण झाले होते. तर याबाबत पोलिसांनी पालिका अधिकाऱ्यांशी याबाबत कोणतीही चर्चा न करता कारवाई केल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले होते. यापुढेही पालिकेची ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स -
अशी होती कालची पोलिसांची कारवाई –
पोलिसांनी काल केलेली कारवाई ही ऐन गर्दीच्या वेळी म्हणजेच सायंकाळी न करता सकाळी कोणीही नसताना करण्यात आली होती. मात्र आजची पालिकेची कारवाई ही दुपारी ३ वाजल्यानंतर कर आली. घाटकोपर पश्चिम येथील या सर्व रस्त्यांवर फेरीवाल्यांमुळे एकीकडे नागरिकांना धड चालताही येत नाही तर दुसरीकडे रिक्षांनाही ये जा करता येत नाही त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आजच्या कारवाईत काही अंशी का होईना मात्र त्यांना दिलासा मिळाला आहे.


