spot_img

Mumbai : मराठी कलावंतांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते अभिनेते प्रशांत दामले यांचा गौरव

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : मराठी नाट्य, चित्रपटसृष्टी जपण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सवलती दिल्या जातील. मराठी कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी आज दिली.

माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले(Prashant Damle) यांच्या १२ हजार ५०१ व्या विक्रमी नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त प्रशांत दामले यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

नाट्यसृष्टीत नाटकांचे तब्बल १२ हजार ५०० प्रयोग अभिनेते प्रशांत दामले यांनी केले, ही राज्याच्यादृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी प्रशांत दामले यांचे अभिनंदन केले.

प्रशांत दामले यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याला उत्तर देताना प्रशांत दामले यांना पद्म पुरस्कार देण्याबाबतचा शिफारशीचा प्रस्ताव मागणी करण्याअगोदरच केंद्र सरकारला पाठविला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

कलावंतांना मोठे मंच उपलब्ध व्हावे यासाठी मुंबई आणि ठाण्यामध्ये चित्रनगरी उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.

राज्यातील नाट्यगृहाची स्थिती सुधारण्यासाठी त्या नाट्यगृहांची दुरूस्ती करण्याबाबत यापूर्वी बैठक घेवून निर्देश दिले आहेत. खराब स्थितीतील नाट्यगृहांच्या पाहणीसाठी एक नोडल अधिकारी नेमला जाईल आणि त्या नाट्यगृहांची लवकरात लवकर दुरुस्ती केली जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

राज्याला केंद्राची साथ मिळत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यासाठी सव्वा दोनशे प्रकल्पांना दोन लाख कोटी रुपये अनुदान, आर्थिक मदत केलेली आहे. यामुळे कुठलेही प्रकल्प आता थांबणार नाहीत. राज्यातील प्रकल्पांना केंद्र सरकारची आता तत्काळ मंजुरी मिळत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

लोकांच्या भेटीगाठी, गाऱ्हाणी आणि भावना ऐकण्यासाठी बराचवेळ लागत असल्याने नियोजित कार्यक्रमांना पोहोचण्यास उशीर होत आहे, त्यामुळे अभिनेते प्रशांत दामले यांच्या १२५०१ व्या प्रयोगाचा पहिला भाग पाहायला मिळाला नाही. या प्रयोगाचा शो ठाण्यातही होणार आहे, तो पूर्ण पाहणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात एक चांगले वातावरण निर्माण झाले आहे. हे जनतेचे, सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. आमच्या सरकारला तीन महिने झाले आहेत. आणखी लोकहिताची कामे करायची आहे, थोडा वेळ द्या, असे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

मराठी नाट्यसृष्टीबद्दल बोलतांना जसे विष्णूदासांचे नाव घेतले जाते तसे आता प्रशांत दामले यांचे नाव घेतले जाईल. कलेची सेवा ते सातत्याने करतात. समर्पण भावनेने काम करणाऱ्यांचा सन्मान होत आहे. आता १२,५०० प्रयोग झाले, भविष्यात २५ हजार प्रयोग करावे. नाटकाचा निखळ आनंद लुटला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी म्हटले.

Explore our articles