
जेष्ठ चित्रपट समीक्षक व फिल्मेकर अशोक राणे यांनी केले कौतुक
दीपक पवार
मुंबई : जल-जंगल-जमीन आणि आपल्या आदिम संस्कृतीच्या हक्क आणि संवर्धनासाठी १९७० पासून ‘सत्यशोधक लाल बावटा’ हाती घेऊन उभ्या केलेल्या संघर्षात मध्यभागी उभी असणारी ही आदिमाय म्हणजेच साजूबाई गावित(Sajubai Gavit) होय. ‘साजूबाई गावित – सत्यशोधक आदिमाय’ हा माहितीपट खरे तर साजूबाई गावित नावाच्या एका सामान्य आदिवासी स्त्रीच्या असामान्य लढ्याची यशोगाथा आहे. आदिमाय साजूबाईंनी निर्भिडपणे उभा केलेला जल-जंगल-जमीन हक्काचा संघर्ष हा माहितीपट उकलून दाखवितो, हे या माहितीपटाचे महत्व आहे, असे उद्गार जेष्ठ चित्रपटसमीक्षक व फिल्मेकर अशोक राणे यांनी काढले.
या माहितीपटाची निवड ‘इंडिक फिल्म उत्सव-२०२२’(‘Indic Film Utsav-2022’) या ऑनलाईन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी करण्यात आली आहे. हा चित्रपट महोत्सव १० ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ऑनलाईन साजरा होणार आहे. या चित्रपट महोत्सवासाठी आलेल्या शेकडो अर्जांतून केवळ ११ चित्रपटांची आणि ११ माहितीपटांची निवड ‘इंडिक फिल्म उत्सव-२०२२’ साठी केली गेली आहे. त्यात ‘साजूबाई गावित – सत्यशोधक आदिमाय’ चा समावेश झाल्याने महाराष्ट्रातील आदिवासी पाड्यावर आनंद साजरा करण्यात येत आहे. ‘साजूबाई गावित – सत्यशोधक आदिमाय’ या माहितीपटाची निर्मिती सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांनी केली असून, या माहितीपटाचे दिग्दर्शन अजित देशमुख यांनी केले आहे. हा माहितीपट मुंबई प्रेस क्लबमध्ये पत्रकारांना दाखविण्यात आला. यावेळी जेष्ठ चित्रपटसमीक्षक, फिल्मेकर शोक राणे, तसेच रामसिंग गावित, किशोर ढमाले, करणसिंग कोकणी, होमाबाई गावित, लीलाबाई वळवी, रणजीत गावित, विजया दुर्धवळे, आर. टी. गावित, दिलीप गावित, प्रमोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय सिनेमासृष्टीत(Indian cinema) लघुपट, माहितीपट यांना प्रचंड महत्व होते. पूर्वी सिनेमागृहात मुख्य चित्रपट सुरू होण्यापूर्वी सामाजिक आणि सरकारी नागरिक म्हणून प्रबोधनासाठी लघुपट, माहितीपट दाखविण्यात येत होते, ते बंद झाले आहे. मात्र, साजूबाई गावित या आदिवासी महिलेने केलेला संघर्ष या माहितीपटातून उलगडला आहे. तसेच, यातून आयुष्यभर हक्काची जमीन मिळविण्यासाठी केलेला संघर्ष, त्यातील लढ्याचे अनुभवकथन, स्त्रियांच्या हक्कासाठी घेतलेली भूमिका अधोरेखित होते. सरकार आणि वसाहातिक वनखात्याने आदिवासींच्या पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या जमिनी, जंगल हिसकावून घेतले, म्हणून आदिमाय साजूबाईंनी वनखात्याला ठणकाविले की, ‘आदिवासी नाही, तर वनखातेच अतिक्रमणदार आहे.’ आदिवासी पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या जमिनी ताब्यात ठेवण्यासाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या नेतृत्वाखाली त्यांनी केलेल्या संघर्षाची कहानी, खुद्द साजूबाईंच्या आणि सहकाऱ्यांच्या तोंडून या माहितीपटात ऐकायला मिळते, असेही अशोक राणे यांनी यावेळी सांगितले.

आदिवासी हिंदू नाहीत; आदिवासी निसर्गपूजक-संवर्धक
साजूबाईंनी जितक्या ठामपणे वनखाते आणि सत्ताधारी जातीवर्गाशी संघर्ष करीत ठाम भूमिका घेतल्या, आंदोलने संघटीत केली, त्यांचा तोच धारधार विचार, ठामपणा सांस्कृतिक प्रबोधनात दिसून येतो. आदिम संस्कृतीला दुय्यम ठरवित आघात करणाऱ्या तथाकथित मुख्यप्रवाही ‘संस्कृतीरक्षकांना’ त्या ठामपणे सुनावितात की, आदिवासी हिंदू नाहीत आणि आदिवासी निसर्गपूजक-संवर्धक असल्याचा वास्तव इतिहास त्या मांडत जातात.
‘वनखाते-सरकार अतिक्रमणदार आहेत’ आणि ‘आदिवासी हिंदू नाहीत, निसर्गपूजक आदिधर्मी आहेत’ ही त्यांच्या जीवनसंघर्षातील प्रमुख दोन सूत्रे या माहितीपटातून अधोरेखित होतात. जमिनीला ‘याहाकी’ म्हणजे ‘आई’ मानणारी संस्कृती, जंगलावर नितांत प्रेम करणारी ‘आदिवासीयत’ आणि त्यासाठी लढणाऱ्या सत्यशोधक पार्टी मदर साजूबाई गावित ह्या या पद्धतीने संघर्ष करणाऱ्या देशातील पहिल्या आदिवासी स्त्री असतील हे म्हणणे अतिशयोक्त ठरणार नाही, असे मत आदिवासी नेत्या कॉम्रेड होमाबाई गावित आणि लीलाबाई वळवी यांनी व्यक्त केले.
५० वर्षांहून अधिककाळ शोषणाविरुद्ध संघर्ष
५० वर्षांहून अधिककाळ शोषणाविरुद्ध संघर्ष(struggle) केलेल्या सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या नेते-कार्यकर्त्यांच्या जीवनप्रवासाला माहितीपटातून पुढे आणण्याचा संकल्प सभेने केला. या प्रयत्नांना दिग्दर्शक अजित देशमुख यांनी साजेशी साथ दिली. आदिवासींचे जीवन, लढे आणि जीवनदृष्टीचा हा ऐतिहासिक दस्तऐवज रसिक-प्रेक्षकांनाही भावेल, आवडेल अशी अपेक्षा आहे.
भारतातील सध्याची सामाजिक-राजकीय परिस्थिती पहाता आणि भारतातील जल-जंगल-जमिनीवर कब्जा करू पहाणाऱ्या कार्पोरेट शक्तींच्या(corporate forces) कारवाया पहाता, अशा माहितीपटाची निर्मिती होणे हे येथील लोकशाहीच्या व कष्टकरी जनतेच्या भवितव्याच्या दृष्टीने आशादायक आहे, असे मत आदिवासी शेतकरी नेते कॉम्रेड किशोर ढमाले आणि करणसिंग कोकणी यांनी व्यक्त केले.


