
मुकुंद लांडगे
मुंबई : (MUMBAI) घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरातील पोलिसांच्या दक्षता हाउसिंग सोसायटीतील अनेक इमारतींचे छत कोसळण्याच्या दुर्घटना सतत घडत आहेत. गेल्या वर्षभरात येथील रहिवासी पालिका आणि म्हाडाकडे(MHADA) स्थलांतरासाठी याचना करीत होते. मात्र, याकडे कोणाचेही लक्ष गेले नव्हते. तीन दिवसांपूर्वी एका घराचे छत कोसळून दोघेजण गंभीर जखमी झाल्यानंतर पालिका आणि म्हाडाला जाग आली. अखेर येथील इमारतींची पाहणी या अधिकाऱ्यांनी केली.
येथील इमारतींचे(buildings) रोजच छत कोसळण्याच्या घटना घडत आहेत. या आठवड्यात अशा ३ घटना घडल्या, तर गेल्या वर्षभरात तब्बल १२ दुर्घटना घडल्याचे रहिवासी सांगतात. तीन दिवसांपूर्वीच्या दुर्घटनेत येथील गोदावरी क्रमांक-१ या इमारतीतील एका रूमचे छत कोसळून त्यात ज्योती म्हसणे आणि मानव शाह हे जखमी झाले, त्यांच्यावर पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, या दुर्घटनेनंतर येथील पोलीस पत्नींनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता दुर्घटना घडली त्यावेळीच पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तर, आता म्हाडाच्या अधिकाऱ्यांनीही येथील इमारतींची पाहणी केली. याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात येणार असून, त्यानंतर येथील रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे या पाहणी केलेल्या अधिकाऱ्यांनी रहिवाशांना सांगितले आहे, अशी माहिती दक्षता सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत म्हाडा, तसेच पालिकेला पत्रव्यवहार करूनही याकडे दुर्लक्ष होत होते, त्यामुळे गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली स्लॅब कोसळण्याची मालिका सुरूच आहे. घाटकोपर पूर्वेकडील रमाबाई आंबेडकर नगरातही(Ramabai Ambedkar Nagar) जवळपास २३ इमारतींची पोलीस वसाहत आहे. १९९६ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तिचे उद्घाटन केले होते. मागील आठवड्यात गोदावरीपूर्वी येथील गणेश बिल्डिंगमधील रूम नंबर ८ मध्ये बाळासाहेब काकड यांच्या रूममधील स्लॅब कोसळले होते. आता म्हाडा अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून, त्याबाबतच्या अहवालानुसार काय निर्णय घेतला जातो याकडे आमचे डोळे लागले आहेत, अशी प्रतिक्रिया सोसायटीचे पदाधिकारी दशरथ आव्हाड, तसेच अजय बोडके यांनी दिली.


