
मुंबई : पुण्यातील चॅम्प एंड्यूयेरस्म संस्थेच्या वतीने येत्या १३ नोव्हेंबर रोजी मुंबईत जियो मुंबई सायक्लोन हा घोडदौड कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यात मुंबई पोलिसांना सहभागी होण्याचे आवाहन आयुक्तालयाने केले आहे. त्यात सहभागी होणाऱ्यांना खास मेडल देण्यात येणार असल्याने पोलिसांचा सहभाग मोठा असेल अशी माहिती देण्यात आली आहे.
हा कार्यक्रम येत्या १३ नोव्हेंबर रोजी सकाळी (पहाटे) ५ वाजता बीकेसी – सी लिंक मार्गे वरळी जंक्शन येथे जाणार असून, त्यासाठी ५ , १०, २५, ७५ तसेच १०० किमी ची मर्यादा ठेवण्यात आली आहे. यात सहभागी होणाऱ्या पोलिसांसाठी चहा, नाष्टा पाण्याची सोय केली असून त्यांना एक खास पदक देण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त कार्यालय पोलीस उप आयुक्त (अभियान) संजय लाटकर यांनी म्हटले आहे. ज्यांना यात सहभागी व्हायचे असेल त्यांच्यासाठी हे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक, क्रीडा, सशस्त्र पोलीस दल नायगाव मुंबई यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर समूह कार्यक्रमाच्या आयोजिका म्हणून शर्मिला मुंज यांची निवड केली आहे. त्यांना पोलिसांनी ९६१९९७५८४७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, याबाबत काल पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षातून बिनतारी संदेश पाठवण्यात आला असून, सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शाखा, प्रभारी अधिकारी, सर्व परिमंडळ तसेच सर्व विभागांचे पोलीस उप आयुक्त यांच्यासह इतर संबंधितांना कळवण्यात आले आहे.


