
Indiagroundreport वार्ताहर
नवी दिल्ली : आरोग्यक्षेत्राचा कणा असणा-या परिचारिकांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील चार परिचारिकांना हा पुरस्कार जाहीर झाला होता, तीन परिचारिकांना(nurses) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वर्ष 2021चा राष्ट्रीय फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार वितरण सोहळा आज राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू(Draupadi Murmu) यांच्याहस्ते 50 परिचारिकांना, तसेच परिचारक यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय राज्य आरोग्य तथा कुटुंब कल्याणमंत्री डॉ. भारती पवार या उपस्थित होत्या.
सोलापूर जिल्ह्यातील मोरूची येथील मनिषा भाऊसो जाधव, सहायक नर्सिंग मिडवाइफरी(ANM) यांना आरोग्यक्षेत्रात 16 वर्षांचा अनुभव आहे. आतापर्यंत त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध आरोग्य विभागातील योजनांचे प्रभावीरित्या अंमलबजावणी केलेली आहे. मनिषा जाधव यांनी माता आणि बालकल्याण क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. मनिषा जाधव यांनी क्षयरोग्यांना हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेले आहे. त्यांच्या या कामांची दखल घेत आज त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या महिला आरोग्य सहाय्यक(LHV) राजश्री तुळशीराम पाटील यांना आरोग्यक्षेत्राचा 22 वर्षांचा अनुभव आहे. राजश्री पाटील यांचा केंद्र तसेच राज्य शासनाच्या आरोग्य योजनांमध्ये सक्रीय सहभाग असतो. राजश्री पाटील यांना जिल्हा, राज्य पातळीवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
पुणे येथील राज्य ग्राम आरोग्य परिचारिका(VHN) तसेच राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाच्या निवृत्त मेट्रन अल्का कोरेकर यांनाही फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरविण्यात आले. अल्का कोरेकर यांनी तीन दशकांपासून अधिककाळ आरोग्य क्षेत्रात सेवा दिलेली आहे. सद्या त्या राज्य सार्वजनिक आरोग्य परिचारिका आहेत. 1989 मध्ये रायगड येथे आलेल्या पुरामध्ये, तसेच लातूर येथे आलेल्या भूकंपाच्या प्रसंगी पुर्नवसन झालेल्या रूग्णांची सेवा अल्का कोरेकर यांनी केली आहे. वर्ष 2018 मध्ये त्यांना यूनिसेफतर्फे लसीकरणाची अंमलबजावणी उत्कृष्ट करण्यासाठी ‘अ’ दर्ज्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. कोव्हिड काळात केलेल्या रूग्णसेवांमुळे राज्य शासनाच्यावतीने त्यांना विविध 4 पुरस्कार, तर जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीनेही पुरस्कृत करण्यात आले आहे.
अंजली अनंत पटवर्धन यांनाही फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार(Florence Nightingale Award) जाहीर झाला होता. तथापि, काही अपरिहार्य कारणास्वत त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.
मूळ नागपूरच्या असणाऱ्या मीरा धोटे यांनाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मीरा धोटे या दिल्लीतील जयप्रकाश नारायण अपेक्स ट्रामा सेंटर, एम्स येथे उपनर्सिंग अधीक्षक होत्या. मागील 30 वर्षांपासून त्या आरोग्यक्षेत्रात कार्यरत होत्या. त्यांनी नर्सिंग व्यवस्थापनात पदविका घेतलेली आहे. कोव्हिडच्या काळात एम्समध्ये सुनियोजित पद्धतीने व्यवस्थापन करण्यात मीरा धोटे यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली. संक्रमण देखरेख, कायाकल्प, स्वच्छ भारत हे आरोग्याशी संबंधित उपक्रम राबविल्याबद्दल मीरा धोटे यांना अनेक प्रमाणपत्रांनी यापूर्वीही सन्मानित करण्यात आलेले आहे.
प्रदान करण्यात आलेले पुरस्कार वर्ष-2021 साठी असून, एकूण 50 परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वरूपात पदक, प्रशस्तीपत्र आणि 50 हजार रूपये रोख प्रदान करण्यात आले आहे. हा पुरस्कार 1973 पासून देण्यात येत आहे.


