Mumbai : राज्यपालांना पदावरून हटविण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

0
233

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : राज्यपालांना पदावरून हटविण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(BhagatSingh Koshyari) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज्यभरात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलने केली आहेत.

दीपक दिलीप जगदेव यांच्यावतीने ॲड. नितीन सातपुते(Adv. Nitin Satpute) यांनी ही याचिका दाखल केली आहे. विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जनतेतील एकोपा आणि शांतता बिघडविल्याचा याचिकेत आरोप करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 61 आणि 156 अंतर्गत राज्यपालांविरोधात महाभियोगाची कार्यवाही करावी. याबाबत उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

कलम 61 आणि 156 अंतर्गत राज्यपालांना हटविण्याचा निर्णय घेण्याची या याचिकेत मागणी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले(Savitribai Phule), ज्योतिबा फुले यांचा राज्यपालांनी अवमान केल्याचा याचिकेत ठपका ठेवण्यात आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कलम 19 अंतर्गत बंधने काय? हे देखील याचिकेत अधोरेखित करण्यात आले आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

राज्यात सुरु असलेल्या गदारोळादरम्यान राज्यपाल दिल्ली(Delhi) दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या 24 व 25 नोव्हेंबर असा दोन दिवस राज्यपालांचा हा दौरा असेल. उत्तर भारतात राज्यपाल कोश्यारी यांचे नियोजित कार्यक्रम आहेत. मात्र, वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपाल दिल्ली दौऱ्यावर असल्याने विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.