MUMBAI : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना’ संजीवनी ठरेल : मुख्यमंत्री

0
364

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ५२ ठिकाणी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने आजपासून सुरू

मुंबई :’हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना’ लोकांना संजीवनी ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज़ व्यक्त केला. धारावी परिसरातील ‘काळा किल्ला’ नजीक आयोजित कार्यक्रमादरम्यान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्राथमिक आरोग्य सेवा सक्षमीकरण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आज़ करण्यात आले. काळा किल्ला परिसरातील दवाखान्यासह बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ५२ ठिकाणच्या आरोग्य केंद्रांचे लोकार्पण आज दूरदृष्य प्रणालीच्या सहाय्याने करण्यात करण्यात आले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, राज्याचे पर्यटन आणि महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, स्थानिक खासदार राहुल शेवाळे आणि महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार आणि मान्यवरांची उपस्थिती होती. तर आमदार मंगेश कुडाळकर हे एल विभाग परिसरात आयोजित कार्यक्रमाच्या ठिकाणाहून दूरदृष्टी प्रणालीद्वारे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, उपायुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे आणि सार्वजनिक आरोग्य खात्याच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर मंगला गोमारे यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी आणि परिसरातील नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते फीत कापून दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलनासह हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. आजच्या कार्यक्रमादरम्यान दवाखान्यात आलेल्या काही रुग्णांशीही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून संवाद साधला. दवाखान्यात आलेल्या रुग्णांनी आणि परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनीनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

या कार्यक्रमादरम्यान दूरदृष्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विभागातील दवाखान्यात कार्यरत वैद्यकीय कर्मचारी आणि तेथे उपचारासाठी आलेले नागरिक यांच्याशी संवाद साधला.

आपल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कोरोनाकाळातील कामाचे कौतुक केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे याप्रसंगी सांगितले की, ठाण्यातून ‘आपला दवाखाना’ या संकल्पनेला सुरवात करण्यात आली. मात्र मुंबईतून आपण अशी काही सुरुवात करू शकतो का? याबाबत त्यांनी आयुक्त चहल यांच्याशी सविस्तर चर्चा केली. पैशांअभावी अभावी नागरिकांना उपचार मिळाला नाही, असं मुंबईत होऊ नये आणि सर्वसामान्य नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार मिळावे या उद्देशाने बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी या उपक्रमाची सुरुवात होत आहे. या उपक्रमाची चांगल्या प्रकारे सुरुवात केल्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अभिनंदन शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाचा फायदा सर्वांनाच होणार आहे. लोकांना त्यांच्या घराजवळ उपचार मिळण्यासाठी या धर्तीवर राज्यभरात ७०० दवाखाने उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री शिंदे यांनी याप्रसंगी दिली.
लवकरात लवकर मुंबईचा नियोजनबद्ध कायापालट करण्याचा मानस आणि त्यादृष्टीने राज्य सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री श्री दीपक केसरकर यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना दिली. तर राज्याचे पर्यटन, महिला आणि बालविकास तथा मुंबई उपनगराचे पालकमंत्री श्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, प्रत्येक रुग्णाला आपल्या दारात आता रुग्णसेवा मिळणार आहे. सर्व जगभरात या उपक्रमाची चर्चा भविष्यात होईल. भारताच्या विविध भागातून या उपक्रमाची माहिती घेण्यासाठी मुंबईत येतील. इतका हा उपक्रम यशस्वी होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना माननीय नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अभिनंदन केले. तसेच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी धारावीची निवड केल्याबद्दलही त्यांनी मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबालसिंह चहल यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्तविक केले. आपल्या प्रास्ताविकादरम्यान डॉ. इकबालसिंह चहल यांनी या दवाखान्यांमागील संकल्पना व करण्यात येत असलेले नियोजन आणि अंमलबजावणी याबाबत माहिती सांगितली. आजच्या कार्यक्रमादरम्यान या उपक्रमाची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या अखेरीस अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी आभार प्रदर्शन केले. तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे कळविण्यात आलेल्या माहितीनुसार हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्राथमिक आरोग्य सेवा सक्षमीकरण योजनेअंतर्गत सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यासाठी उपलब्ध दवाखान्यात दुस-या सत्रात आणि अनेक ठिकाणी मोकळ्या जागेत पोर्टा केबिन मध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने सुरू करण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत साधारणपणे २५ हजार ते ३० हजार लोकसंख्येसाठी १ याप्रमाणे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना सकाळी ७ ते २, दुपारी ३ ते रात्री १० (Porta Cabin ) मध्ये तसेच उपलब्ध दवाखान्यांमध्ये सकाळी ९ ते ४ संध्याकाळी ३ ते रात्री १० या वेळेत सुरु करण्यात येत आहेत, अशी माहिती या निमित्ताने सार्वजनिक आरोग्य खात्यात द्वारे कळविण्यात आली आहे.

सदर दवाखान्यांमध्ये मोफत वैद्यकीय तपासणी, औषध उपचार व किरकोळ जखमांवर मलमपट्टी, तसेच १४७ प्रकारच्या रक्त चाचणी मोफत पुरवण्यात येणार आहेत याव्यतिरिक्त एक्स-रे, सोनोग्राफी, इत्यादी चाचण्या करिता पॅनल वरील डायग्नॉस्टीक केंद्राद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दरात करण्यात येत आहेत. तसेच उपलब्ध दवाखान्याची दर्जोन्नती करून विशेषज्ञांच्या सेवा उपलब्ध दवाखान्यात पॉली क्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर मार्फत देण्यात येत आहे. उपलब्ध दवाखान्याची दर्जोन्नती करून (कान-नाक-घसा तज्ञ, नेत्रचिकित्सा, स्त्री-रोग तज्ञ, वैद्यकीय तपासणी तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, त्वचा रोग तज्ञ, दंतशल्य चिकित्सा, बालरोग तज्ञ, आदी विशेषज्ञांच्या सेवा उपलब्ध दवाखान्यात पॉली क्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर मार्फत सकाळी ९ ते ४ या वेळेत देण्यात येत आहे. मोफत वैद्यकीय तपासणीसह औषध उपचार, १४७ प्रकारच्या रक्त चाचणी या सुविधा मोफत पुरवण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त एक्स-रे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, एम.आर.आय इत्यादी चाचण्या करिता पॅनल वरील डायग्नॉस्टीक केंद्राद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दरात करण्यात येतील. सदर दवाखान्यामधून टॅब आधारित पध्दतीने सॉफ्टवेअर च्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशिल, औषधांचा साठा व वितरण तसेच संदर्भित केलेल्या निदान सुविधा यांचा तपशिल नोंदविण्यात येईल ज्यायोगे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखानेचे कामकाज हे विनाकागद अर्थात पेपरलेस पद्धतीने व पर्यायाने पर्यावरण पूरक असणार आहे.