spot_img
Home Ahamadnagar-mr Ahamednagar : किसान सभेच्या ‘त्या’ आंदोलनाची यशस्वी सांगता

Ahamednagar : किसान सभेच्या ‘त्या’ आंदोलनाची यशस्वी सांगता

0
323

सहाय्यक निबंधक यांनी शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्याचे दिले आश्वासन

दीपक पवार
अकोले : पीक कर्जमाफी, गायरान जमीन, वनजमीन प्रश्नी तीन दिवसापासून अकोलेसह महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या रात्रंदिवस ठिय्या आंदोलनाची यशस्वी सांगता संविधान दिनी करण्यात आली. अखेर अकोले(Akole) तालुक्याचे सहाय्यक निबंधक कांदळकर यांनी याबाबत हस्तक्षेप करीत शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्याचे आंदोलकांना आश्वासन दिले.

गुरुवारपासून तालुक्यातील गावागावातून शेकडो श्रमिक आपल्या मागण्यांसाठी थंडी-गारठ्याची पर्वा न करता अकोले तहसील कार्यालयासमोर बसून होते. दारिद्र्यरेषेच्या यादीत समावेश व्हावा यासाठी तालुक्यात २००९मध्ये किसान सभेने १६००० अपील दाखल केली होती. छाननीअंती यापैकी ८९६३ अर्ज पात्र करण्यात आली होती. यापैकी ३२७४ जणांना गेली ११ वर्षे लाभही देण्यात आला. मात्र, कोव्हिड काळात(Covid era) या याद्या बदलण्यात आल्या. किसान सभेने याबाबतची चूक प्रशासनाच्या लक्षात आणून देऊनही सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने किसान सभेला आंदोलन करावे लागले, असे शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी सांगितले.

सांगता झालेल्या आंदोलनात याबाबतची चूक सुधारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांना दोन्ही कर्जमाफीच्या यादीतून वंचित ठेवण्यात आले आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे शेकडो आदिवासी शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून दूर राहिले. आता या शेतकऱ्यांकडून कर्जवसुली केली जात आहे. किसान सभेने(The Kisan Sabha) आंदोलनात मागणी करीत बँकेच्या अधिकाऱ्यांच्या चुका चव्हाट्यावर आणल्या. अखेर अकोले तालुक्याचे सहाय्यक निबंधक कांदळकर यांनी याबाबत हस्तक्षेप करीत शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्याचे आंदोलकांना आश्वासन दिले.

तालुक्यातील वनधन केंद्रांना मान्यता मिळावी यासाठीचा आग्रह आंदोलनात लावून धरण्यात आला. आदिवासी प्रकल्प अधिकारी राजेश भवारी, रवी पेढेकर व नाशिक(Nashik) आदिवासी कार्यालयातील अधिकारी राजेश मेश्री यांनी याबाबत चर्चा करून मान्यतेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

वन जमीन व गायरान जमीनप्रश्नी तहसीलदार सतीश थिटे व नायब तहसीलदार महाले व वनाधिकार संयोजक अंजाबापू आयनर यांनी सविस्तर चर्चा करून प्रश्न मार्गी लावले.

किसान सभा व जनवादी महिला संघटनेने ३१ ऑक्टोबर रोजी सादर केलेल्या दारिद्र्यरेषेच्या अपिलांवर तातडीने कार्यवाही होईल, असे अश्वासन सतीश थेटे यांनी दिले.

डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, ज्ञानेश्वर काकड, एकनाथ मेंगाळ, राजाराम गंभीरे, बहिरु रेंगडे, भाऊसाहेब मेंगाळ, मथुराबाई बर्डे, देवराम उघडे, बाळासाहेब मधे, एकनाथ गिर्हे, दिलीप हिंदोळे आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.