spot_img
Home crime-mr United Kingdom : फरार झालेल्या नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

United Kingdom : फरार झालेल्या नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

0
288

लंडन कोर्टाने दिले आदेश

Indiagroundreport वार्ताहर
लंडन : पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी भारतातून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीला पुन्हा भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लंडनमधील उच्च न्यायालयाने(High Court) बुधवारी यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला असून, त्यानुसार तब्बल १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीची भारतीय तपास यंत्रणांकडून आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी चौकशी होणार आहे.

नीरव मोदीला(Nirav Modi) भारताच्या ताब्यात देण्यात यावे, यासाठी लंडन कोर्टात भारताकडून सातत्याने बाजू मांडली जात होती. याविरोधात नीरव मोदीने लंडन उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. मात्र, आज या याचिकेच्या सुनावणीदरम्यान लंडन कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे, त्यामुळे नीरव मोदीच्या मुसक्या आवळून त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

फेब्रुवारी महिन्यातच नीरव मोदीला भारताच्या ताब्यात देण्यासंदर्भात वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने निर्णय दिला होता, तेव्हापासून नीरव मोदी वँड्सवर्थ(Wandsworth) तुरुंगात होता. मात्र, त्याने या निर्णयाला आव्हान देणारी याचिका लंडन कोर्टात दाखल केली होती. आपलं मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचा दावा ५१ वर्षीय मोदीने याचिकेत केला होता. त्याच आधारावर आपल्याला भारतात पाठवू नये, अशी मागणी त्याने केली होती.

भारतात(In India) नीरव मोदीवर तब्बल १३ हजार ५०० कोटींचा पंजाब नॅशनल बँक घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेकडून जारी करण्यात आलेल्या कागदपत्रांचा नीरव मोदीच्या ताब्यातील कंपन्यांना फायदा झाल्याचा आरोप या घोटाळ्यात करण्यात आला होता. यासोबतच, पुरावे गायब करणे आणि साक्षीदारांवर दबाव टाकणे, मृत्यूसाठी कारणीभूत ठरणे, असे गुन्हेदेखील सीबीआयने(CBI) नीरव मोदीवर दाखल केले आहेत.