
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची माहिती
दिव्यांगांसाठी प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन
दीपक कैतके
मुंबई : सामाजिक न्याय, आदिवासी विकास, अल्पसंख्याक विकास विभागाच्या धर्तीवर राज्यात दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र खाते निर्माण करण्यात येणार आहे. या खात्यासाठी स्वतंत्र मंत्री आणि सचिव असतील, अशी माहिती प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते तथा माजी आमदार बच्चू कडू(Bachchu Kadu) यांनी बुधवारी दिली. याशिवाय, दिव्यांगांसाठी प्रत्येक जिल्हयात दिव्यांग भवन आणि पुनर्वसन केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी आज मंत्रालयात राज्यातील दिव्यांगांच्या प्रश्नावर बैठक घेतली. या बैठकीला बच्चू कडू उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती बच्चू कडू यांनी पत्रकारांना दिली. एकनाथ शिंदे यांनी दिव्यांगांसाठी स्वतंत्र खाते निर्माण करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या ३ डिसेंबर रोजी साजरा होणारा ‘दिव्यांग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. यादिवशी एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र लावून राज्यातील ३ ते ५ हजार दिव्यांग रक्तदान करतील, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.

आजच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, दिव्यांगांची नोंदणी करणारा अकोला आणि ठाणे पॅटर्न(Akola and Thane pattern) राज्यभर राबविण्यात येणार आहे. अकोल्यात फक्त १० हजार दिव्यांगांची नोंद होती. घरोघरी जाऊन सर्वेक्षण केल्यानंतर दिव्यांगांची संख्या ४५ हजार इतकी झाली. त्यामुळे राज्यभर दिव्यांगांचे सर्वेक्षण करून त्यांची नोंदणी केली जाणार आहे. बोगस दिव्यांगता रोखण्यासाठी यापुढे दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय याचा लाभ न देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. दिव्यंगांना एकच कार्ड दिले जाणार असून, या कार्डावर सर्व लाभ देण्याचे सरकारने आजच्या बैठकीत मान्य केले आहे.
यापूर्वी वसतिगृहात(hostel) दिव्यांग विद्यार्थ्याला प्रवेश दिला जात नव्हता. आता वसतिगृहात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तळमजला राखून ठेवला जाणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या धर्तीवर दिव्यांगांसाठी ‘स्वाधार योजना'(‘Swadhar Yojana’) राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली.


