spot_img

Mumbai : सेंट्रल रेल्वेच्या १० कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार’

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : अनिल कुमार लाहोटी(महाव्यवस्थापक, सेंट्रल रेल्वे) यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोजित समारंभात मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर विभागातील प्रत्येकी २ सेंट्रल रेल्वे(Central Railway) कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार’ प्रदान केला. सप्टेंबर/ऑक्टोबर-२०२२ या महिन्यात कर्तव्यादरम्यान त्यांच्या सतर्कतेचा, अनुचित घटना टाळण्यात आणि रेल्वे परिचालनात सुरक्षितता सुनिश्चित करण्यात त्यांचे योगदान याबद्दल कौतुक म्हणून हे पुरस्कार देण्यात आले. या पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय सुरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्रक आणि रु. २०००/- रोख पुरस्काराचा समावेश आहे.

मुंबई विभाग

गुड्डू कुमार सिंग(ट्रॅक मेंटेनर, कर्जत, मुंबई विभाग) हे दि. ४ ऑक्टोबर २०२२ रोजी भिवपुरी-कर्जत विभागात पेट्रोलिंग ड्युटीवर असताना, त्यांना रूळाला अनेक ठिकाणी तडा असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. आपत्कालीन ब्लॉक घेण्यात आला आणि तडा गेलेला रूळ(cracked track) बदलण्यात आला, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दि. २० जानेवारी १९८८ रोजी जन्मलेले गुड्डू कुमार सिंह हे ५ वर्षांपासून रेल्वेची सेवा करीत असून, ते भिवपुरी येथे पत्नी आणि दोन मुलांसह राहतात.

आशिष लोंढे(इलेक्ट्रिकल सिग्नल मेंटेनर, कुर्ला, मुंबई विभाग) हे कर्तव्यावर असताना त्यांना दादर-कुर्ला विभागात दि. १ ऑक्टोबर २०२२ रोजी किमी 13/227 येथे रुळाला तडा गेल्याचे दिसले. त्यांनी ताबडतोब सिग्नल व दूरसंचार नियंत्रण कक्षाला याबाबत कळविले आणि समस्येकडे लक्ष देण्यात आले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दि. ६ मे १९८८ रोजी जन्मलेले आशिष लोंढे हे रेल्वेत १४ वर्षांपासून सेवा करीत असून, ते बदलापूर(Badlapur) येथे पत्नीसह राहतात.

पुणे विभाग

प्रशांत गरूड(उपस्टेशन व्यवस्थापक, तळेगाव, पुणे विभाग) हे दि. २० सप्टेंबर २०२२ रोजी मालगाडीद्वारे सिग्नलची देवाणघेवाण करताना त्यांना इंजिनखाली ठिणग्या दिसल्या. त्यांनी ताबडतोब याबाबत स्टेशन मास्तर(कामशेत) यांना सूचित केले. जिथे ट्रेन थांबली होती तेथे तपासणी केली आणि एक पाईप लटकलेला दिसला, ज्याची दखल घेतली गेली आणि ट्रेन पुढे निघाली. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. दि. १२ जुलै १९८८ रोजी जन्मलेले प्रशांत गरुड हे ४ वर्षांपासून रेल्वेची सेवा करीत असून, ते पत्नीसह तळेगाव येथे राहतात.

प्रमोद देवीदास(तंत्रज्ञ, पुणे, पुणे विभाग) यांनी दि. ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी रोलिंग एक्झाम दरम्यान ट्रेन क्रमांक 11302 अपच्या एका डब्यात एक तुटलेला बाह्य स्प्रिंग पाहिला जो बाहेरून स्पष्टपणे दिसत नव्हता. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कळविण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. दि. १६ डिसेंबर १९७३ रोजी जन्मलेले प्रमोद देवीदास हे रेल्वेत २८ वर्षांपासून सेवा करीत असून, ते पत्नी आणि दोन मुलांसह पुण्यात राहतात.

भुसावळ विभाग

राज कुमार डोमन(ट्रॅक मेंटेनर, भुसावळ विभाग) यांनी दि. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी पेट्रोलिंग ड्युटीवर असताना किलोमीटर 434/26 येथे रुळाच्या तड्यातील ८० मिलिमीटर अंतर पाहिले. त्यांनी तात्काळ ट्रॅकचे संरक्षण केले आणि संबंधित अधिकार्‍यांना याबाबत कळविले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दि. ३ डिसेंबर २०६२ रोजी जन्मलेले राज कुमार डोमन हे रेल्वेत ३८ वर्षांपासून सेवा करीत असून, ते भादली येथे पत्नी व ३ मुलांसह राहतात.

विवेक कुशल प्रकाश(उपस्टेशन मॅनेजर, पाडळी, भुसावळ विभाग) यांना दि. १४ सप्टेंबर २०२२ रोजी मालगाडीद्वारे सिग्नल्सची देवाणघेवाण करताना, एका वॅगनमध्ये एक्सल(हॉट) जळत असल्याचे दिसले. त्यांनी ताबडतोब सर्व संबंधितांना सावध केले, यानंतर घोटी स्थानकावर ट्रेन थांबविण्यात आली, वॅगन वेगळी करण्यात आली आणि नंतर ट्रेन निघाली. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. दि. १४ जून १९९९ रोजी जन्मलेले विवेक कुशल प्रकाश हे रेल्वेत १ वर्षापासून सेवा करीत असून, ते अविवाहित असून, नाशिक(Nashik) येथे राहतात.

नागपूर विभाग

शीतल प्रकाश चव्हाण(सहाय्यक लोको पायलट, नागपूर, नागपूर विभाग) दि. ६ ऑक्टोबर २०२२ रोजी नरखेड-दारिमेटा विभागात मिड-बँकरवर कर्तव्यावर असताना त्यांना बँकरच्या तिसऱ्या वॅगनच्या एक्सलमधून धूर निघताना दिसला. त्यांनी लगेच लोको पायलटला ट्रेन थांबविण्याचा इशारा दिला. तपासणीत एक हॉट एक्सल आढळून आले, ट्रेन हळूहळू आणि सुरक्षितपणे पांढुर्णा स्थानकावर आणण्यात आली, जिथे वॅगन वेगळी करण्यात आली आणि ट्रेन पुढे निघाली. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. दि. १५ जून १९९६ रोजी जन्मलेल्या कुमारी शीतल प्रकाश चव्हाण रेल्वेत ३ वर्षांपासून सेवा करीत असून, नागपूर(Nagpur) येथे राहतात.

विनोद दयाराम(ट्रॅक मेंटेनर, आमला, नागपूर विभाग) दि. २० ऑगस्ट २०२२ रोजी जौलखेडा-आमला विभागात पेट्रोलिंग ड्युटीवर असताना त्यांनी किमी 878/19-20 येथे तुटलेले रूळ वेल्ड पाहिले. त्यांनी तात्काळ ट्रॅकचे संरक्षण केले आणि संबंधित अधिकार्‍यांना याबाबत कळविले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दि. ३ जून १९८६ रोजी जन्मलेले विनोद दयाराम हे रेल्वेत १० वर्षांपासून सेवा करीत असून ते पत्नी, मुलगा आणि मुलीसोबत बैतूल येथे राहतात.
सोलापूर विभाग

उज्ज्वल विश्वास(उपस्टेशन मॅनेजर, ढालगाव, सोलापूर विभाग) हे दि. २६ सप्टेंबर २०२२ रोजी मालगाडीतून सिग्नलची(signals) देवाणघेवाण करताना त्यांना ब्रेक व्हॅनमध्ये ठिणग्या दिसल्या. लाल सिग्नल दाखवून, ट्रेन ताबडतोब थांबविण्यात आली आणि तपासणी करताना फ्लॅट टायर दिसला. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. दि. ११ मार्च १९९० रोजी जन्मलेले उज्ज्वल विश्वास हे रेल्वेत ५ वर्षांपासून सेवा करीत असून, ते पत्नीसह ढालगाव येथे राहतात.

नागनाथ कुणाळे(ट्रॅक मेंटेनर, कुर्डुवाडी, सोलापूर विभाग) हे दि. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी कुर्डुवाडी-मोडलिंब विभागात कर्तव्यावर असताना त्यांना मालगाडीच्या १५व्या वॅगनमध्ये स्पार्किंग ब्रेक शू दिसला. त्यांनी ताबडतोब पुढे काम करणाऱ्या त्यांच्या गँगमेटला याबाबत कळविले, त्यांनी लाल सिग्नल देऊन ट्रेन थांबविली. वॅगनच्या बोल्स्टरवर ठेवलेल्या गवताला ब्रेक बाइंडिंगमुळे आग लागल्याचे तपासणीत समोर आले. आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. दि. ५ जून १९८३ रोजी जन्मलेले नागनाथ कुणाळे हे रेल्वेत १० वर्षांपासून सेवा करीत असून ते कुर्डू, माढा येथे पत्नी, मुलगा आणि २ मुलींसोबत राहतात.

अनिलकुमार लाहोटी यांनी यावेळी संबोधित करताना म्हटले की, पुरस्कार विजेत्यांनी प्रशंसनीय काम केले आहे आणि सुरक्षित कामासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखविलेली २४ x ७ सतर्कता इतरांना प्रेरणा देईल आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रामाणिकपणे काम करेल.

आलोक सिंग(अतिरिक्त महाव्यवस्थापक), डी. वाय. नाईक(प्रधान मुख्य संरक्षा अधिकारी), मुकुल जैन(प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक), राजेश अरोरा(प्रधान मुख्य अभियंता), एन. पी. सिंग(प्रधान मुख्य विद्युत अभियंता), मुख्य प्रशासकीय अधिकारी(प्रकल्प) शिशिर दत्त आणि सेंट्रल रेल्वेचे इतर विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते आणि सर्व विभागांचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक हे या कार्यक्रमात व्हर्च्युअली सामील झाले.

Explore our articles