
प्रशांत बारसिंग
मुंबई : राज्यात मध्यावधी निवडणुकांना सामोरे जा, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना केले. मातोश्री निवासस्थानी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांनी जे काम आयुष्यभर केले तेच काम हे स्मारक त्यांच्या माघारी करणार आहे, म्हणून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक हे केवळ संग्रहालय असणार नाही, तर ते लाखो जणांचे प्रेरणास्थान होणार आहे, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
मुंबईत या स्मारकाच्या कामासंदर्भात सादरीकरण झाले. यावेळी आमदार आदित्य ठाकरे, माजीमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, येत्या १७ तारखेला दहा वर्षे पूर्ण होतील. बाळासाहेबांचा दहावा स्मृतीदिन. स्मारकाचा विषय अधूनमधून चर्चेला येतो. स्मारक कधी होणार? कसे असेल? याबाबत कुतूहल आहे. हे सादरीकरण प्राथमिक स्वरूपाचे आहे. मला एक प्रश्न विचारला जातो. पुतळा कसा असेल? मात्र मी सांगतो, येथे पुतळाच नसेल. जागा महापौर बंगल्याची निवडली आहे. हा बंगला वारसा इमारत म्हणून गणला जातो, त्यामुळे वारसा इमारती नियमांचे पालन करून काम करावे लागते. त्यातच समुद्र लागून असल्याने सागरी नियंत्रण विभागाचे नियम पाळावे लागतात. त्यात जमिनीच्या खाली(underground) हे संग्रहालय असणार आहे, त्यामुळे समुद्राच्या पाण्याचा रेटा आहे. संरक्षकभिंत बांधावी लागली असून, संपूर्ण भूमिगत बांधकाम आहे.
उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटले की, राज्यभर शिवसेना प्रमुख बाळासाहेब फिरले. त्यांचे फोटो, बातम्या, दसरा मेळाव्याची भाषणे. मार्मिक, बाळासाहेबांच्या कुंचल्याचे फटकारे, सामनातील लिखाण, असे सारे सारे याठिकाणी असणार आहे. मात्र, बाळासाहेबांची सुरूवातीच्या काळातील ग्रामीण भागातील भाषणे उपलब्ध नाही. भाषणे मिळविण्याचे काम सुरू आहे. घटना घडत असताना त्याचे ऐतिहासिक मूल्य कळत नसते. मार्मिकचे सर्व अंक मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणखी व्यंगचित्रे. जिवंत अनुभव या स्फूर्तीस्थान, प्रेरणास्थानातून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आपणही आपल्याकडे असलेली माहिती, दस्तऐवज, फोटो अवश्य द्यावेत. हे आपणांस आवाहन करतो.
या स्मारकाची मांडणी कशी आहे ते मांडले. एकही बाब राहता कामा नये, याची दक्षता घेतली जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, शिवसेनेचा प्रवासइतिहास मांडला जाईल. त्यात छेडछाड केली जाणार नाही. जे जसे घडले ते सर्व असेल.
शिवसेनेचेच सर्व मुख्यमंत्री असतील. शिवसेनेचे नाव घेऊन हिंडणारे तोतये मात्र नसतील, असा टोमणा देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी हाणला.
या स्मारकाच्या कामाविषयी माहिती देताना सुभाष देसाई(Subhash Desai) म्हणाले की, ५८ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण होणार. सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत. वारसा वास्तूचे नियम पाळले जात आहेत. मुख्य रस्त्यावरून इमारत दिसली पाहिजे, म्हणून भूमिगत बांधकाम केले जात आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या प्रकल्पाची अंमलबजावणी करीत आहे. यासाठी राज्य सरकारने ४०० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. आतापर्यंत १८१ कोटी रूपये खर्च झाले आहेत.


