New York : दोन विमानांची हवेत टक्कर; 6 जणांचा मृत्यू

0
144

Indiagroundreport वार्ताहर
न्यूयॉर्क : अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एअर शो दरम्यान एक भीषण अपघात झाला. दोन विमानांची हवेतच टक्कर(Plane Crashed) झाल्याने पायलट आणि क्रू मेंबर्ससह 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात इतका भीषण होता की, अपघात होताच एका विमानाचे दोन तुकडे झाले, तर दुसरे विमान पूर्णपणे चक्काचूर झाले.

फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन(FAA) नुसार, शनिवारी अमेरिकेतील डॅलस येथे वर्ल्ड वॉर-2 स्मरणार्थ एअर शोचे आयोजन करण्यात आले होते. ते पाहण्यासाठी लांबून लोक येत होते. एअर शो सुरू असताना अचानक बोईंग बी-१७ फ्लाइंग फोर्ट्रेस बॉम्बरची दुसऱ्या बेल पी-६३ किंगकोब्रा फायटरशी समोरासमोर टक्कर झाली.

डॅलस एक्झिक्युटिव्ह विमानतळाजवळ हा अपघात झाला. विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी ट्विटरवर सांगितले की, आपत्कालीन कर्मचारी अपघाताच्या ठिकाणी पोहोचले. अपघातानंतर विमानातील क्रू मेंबर्सची चौकशी करण्यात येत आहे. दोन्ही विमानांमध्ये किती लोक होते हे लगेच स्पष्ट झालेले नाही.

Commissariat Air Force (CAF) चे अध्यक्ष आणि CEO हँक कोट्स म्हणाले की, B-17 मध्ये साधारणपणे चार ते पाच लोकांचा क्रू असतो.

हँक कोट्स म्हणाले की, P-63 मध्ये फक्त एक पायलट आहे, परंतु अपघाताच्यावेळी विमानात इतर किती लोक होते हे त्यांनी सांगितले नाही.

सोशल मीडियावर या अपघाताचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. अनेक लोकांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली होती. दोन विमानांची टक्कर आणि त्यानंतर आगीच्या ज्वाळांमध्ये दोन्ही विमाने खाली येताना दिसत आहेत. विमानं खाली पडल्यानंतर एक मोठा स्फोटदेखील झाला.

लाईव्ह एरियल व्हिडिओमध्ये अपघाताच्या ठिकाणी विमानाचे अवशेष दिसत आहेत. FAA आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड(NTSB) या दोघांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.