MUMBAI : कूपर रुग्णालयात ‘अँजिओप्लास्टी’ चा श्रीगणेशा, पहिल्याच दिवशी तीन रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

0
581

पश्चिम उपनगरांमधून येणाऱया रुग्णांसाठी मोठी सुविधा

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित, विलेपार्ले येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालयामध्ये अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियांना २६ डिसेंबर २०२२ पासून सुरुवात झाली आहे. आज पहिल्याच दिवशी एकूण तीन रुग्णांवर अँजिओप्लास्टी यशस्वीपणे पार पडली आहे. विशेष म्हणजे या तीनही अँजिओप्लास्टी महात्‍मा ज्‍योतिबा फुले जनआरोग्‍य योजने अंतर्गत करण्यात आल्याने सदर गरजू रुग्णांवर खर्चाचा कोणताही भार पडलेला नाही. कूपर रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया सुरु झाल्याने पश्चिम उपनगरांमधील रुग्णांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्‍या विलेपार्ले येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालयामध्ये फेब्रुवारी २०२२ मध्‍ये हृदयरोग विभाग सुरु करण्यात आला. दयरोग विभाग सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी म्हणजे दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ रोजी पहिली अँजिओग्राफी करण्‍यात आली होती. तेव्हापासूनच अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया देखील सुरु करण्याचे प्रयत्न रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात येत होते. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आता रुग्णालय प्रशासनाने हृदयरोग विभाग सुरु केला आहे. रुग्‍णालयाचे अधिष्‍ठाता डॉ. शैलेष मोहिते यांनी हा विभाग सुरु करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच, महानगरपालिकेच्या परळ स्थित राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्‍णालयाचे हृदयरोगविभाग प्रमुख डॉ. अजय महाजन यांनी ही सुविधा सुरु करण्‍यासाठी महत्त्वाचे सहकार्य पुरवले आहे.

साधारणतः आठ दिवसांपूर्वी हृदयविकाराचा धक्का बसल्याने ६० वर्ष वयाचा एक मधुमेहग्रस्‍त रुग्‍ण उपचारार्थ कूपर रुग्‍णालयात दाखल झाला होता. अँजिओग्राफी केल्‍यानंतर सदर रुग्णाच्या हृदयाला रक्‍तपुरवठा करणार्‍या वाहिन्‍यांमध्‍ये दोन ठिकाणी अडथळे (ब्‍लॉकेज) आढळून आले. या रुग्‍णाच्या हातातील रक्‍तवाहिनीमधून २ स्‍टेन्‍ट हृदयापर्यंत नेवून अँजिओप्लास्टी करण्‍यात आली व हृदयाचा रक्‍तपुरवठा यशस्वीपणे पूर्ववत करण्‍यात आला. या व्यतिरिक्त आणखी दोन रुग्णांवर आज अँजिओप्लास्टी करण्यात आली.

महानगरपालिकेचे परळ येथील केईएम रुग्णालय, शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथील बाई य. ल. नायर रुग्‍णालय या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपलब्‍ध असणार्‍या सुविधांच्‍या धर्तीवर अँजिओप्लास्टीसारखी सुविधा देणारे कूपर रुग्‍णालय आता पश्चिम उपनगरातील महानगरपालिकेचे पहिलेच रुग्‍णालय ठरले आहे. हृदयरोगांनी त्रस्‍त असणा-या रुग्‍णांसाठी अँजिओप्लास्टी सारखी सुविधा सुरु केल्‍यामुळे रुग्‍णांना वेळीच उपचार मिळून त्‍याचा लाभ घेता येईल.

आज अँजिओप्लास्टी पार पडलेल्या तीनही रुग्णांवरील अँजिओप्लास्टी व स्‍टेन्‍टसाठी येणारा संपूर्ण खर्च शासनाच्‍या महात्‍मा ज्‍योतिबा फुले जनआरोग्‍य योजने अंतर्गत विनामूल्य करण्‍यात आला आहे. कूपर रुग्णालयात उपलब्ध असणाऱया या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्‍णांना खर्चाचा भार सोसावा लागणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here