Mumbai : यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेली महाराष्ट्राची परंपरा, घडी विस्कटवू नका : अजित पवार

0
224

प्रशांत बारसिंग
मुंबई : यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेली महाराष्ट्राची परंपरा आणि घडी विस्कटवू नका, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारमधील मंत्र्यांवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आज जनता दरबार उपक्रमास आले असता विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अजित पवार म्हणाले की, तुमच्यामध्ये वाचाळवीरांचे मोठे प्रस्थ वाढले आहे. काही मंत्री बोलत आहेत, त्यातून मंत्रिमंडळाची प्रतिमा खराब होत आहे. लोक ऐकून घेत असतात, पहात असतात आणि लक्षात ठेवत असतात. तुमच्यातील काहीजण सहज बोललो म्हणत आहेत, मात्र तुम्ही सहज बोलायला नागरिक नाही, तुम्ही राज्याचे प्रतिनिधी आहात, मंत्री आहात. तुम्ही शपथ घेतलेली आहे आणि संविधानाने तुमच्यावर एक जबाबदारी दिलेली आहे.

मध्यंतरी अब्दुल सत्तार हे माझी बहीण सुप्रिया हिला काही बोलले. विनाशकाली विपरीत बुद्धी असेच त्यांना म्हणावे लागेल, असे अजित पवार म्हणाले.

दोन दिवसापूर्वी अंबरनाथमध्ये दोन गटात गोळीबार करण्याची घटना बैलगाडी शर्यतीत घडली, अशावेळी सरकार काय करीत आहे?, असा सवाल अजित पवार यांनी यावेळी केला.

सत्तेतील किती लोकांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा पुरविली आहे, याची माहिती माहितीच्या अधिकारात मागवली आहे. असे सांगतानाच त्यांना खरंच ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा आवश्यक आहे का?, काहींचा तर ३०-३० सरकारी गाड्यांचा ताफा फिरत आहे. मी उपमुख्यमंत्री होतो तेव्हा जास्त गाड्या असल्या की, नको सांगत होतो. हा पैसा तुमचा नाही, सरकारकडे टॅक्स(tax) रुपाने आलेला आहे. ज्या आमदाराला कुठल्याही पक्षाच्या बंदोबस्त द्यायचा असेल तर जरुर द्या आणि तो दिलाही पाहिजे त्यांचे व नागरिकांचे संरक्षण करणे, महाराष्ट्रातील शेवटच्या जनतेचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु, सरसकट सगळ्यांनाच संरक्षण देण्याची काय आवश्यकता आहे?, असा संतप्त सवालही अजित पवार यांनी केला.

माझा पाच दिवसाचा परदेशातील कार्यक्रम फार पूर्वी ठरला होता, तो रद्द करता आला नाही. शिर्डीतील(Shirdi) शिबिराला एक दिवस उपस्थित राहून गेलो. मात्र, एवढ्या दिवसात मी प्रेससमोर आलो नाही, तर अजित पवार कुठे गेले आहेत. अजित पवार उपलब्ध नाहीत. अजित पवार नाराज आहेत, अशा बातम्या येत होत्या. जे काही आहे ते मी स्पष्टपणे सांगत असतो. राजकारणात असल्यामुळे लोकांमध्ये काम करीत असताना अशा गोष्टी लपवून ठेवणे चालत नसते. मात्र, चार-पाच दिवसात ज्या काही घटना घडल्या त्यावेळी मी येथे नव्हतोच, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.

मी ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या काही क्लिप पाहिल्या आहेत. चित्रपट पाहिला नाही, परंतु लहानपणापासून ऐकत आलो आहे. धिप्पाड अफजलखान इतिहासात दाखविला जात होता. वाघनखे वापरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी(Chhatrapati Shivaji Maharaj) अफजखानाला मारले, त्याचा कोथळा बाहेर काढला, परंतु या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाला उचलून मांडीवर घेऊन(नरसिंहासारखा) कोथळा बाहेर काढताना दाखविले आहे. असे सांगून अजित पवार म्हणाले की, अरे जे काही इतिहासात घडले त्याला तोडफोड करून दाखवू नका, छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे, असा इशाराही अजित पवार यांनी दिला.

‘हर हर महादेव’ हा चित्रपट तज्ज्ञ लोकांना घेऊन मी बघेन आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री(Deputy Chief Minister) यांची भेट घेऊन माहिती देईन. छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासाची मोडतोड केलेली महाराष्ट्राला परवडणारा नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.