Mumbai : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विजयी

0
2123
Mumbai

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (mumbai)
सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने बाजी मारली आहे. या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके(Rituja Latke) या विजयी झाल्या आहेत. ऋतुजा लटके यांना तब्बल 66 हजार 247 मते मिळाली आहेत. त्यांच्यापाठोपाठ दुसरा नंबर नोटाचा आहे. ‘नोटा’ला तब्बल 12 हजार 776 इतकी मते मिळाली आहेत.

ऋतुजा लटके यांनी विजय मिळविताच, प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल शिवसैनिकांनी अंधेरीसह(Andheri) मुंबईतील ठिकठिकाणी फटाके फोडून, तसेच पेढे वाटून जल्लोष केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह उठाव केल्याने शिवसेनेला मोठे खिंडार पडले. या संकटकाळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढील आव्हान वाढले होते. त्यातच अंधेरी पूर्वचे दिवंगत आमदार रमेश लटके यांचे निधन झाले, त्यामुळे ही जागा रिकामी झाली होती. ही जागा काबिज करण्यासाठी भाजपसह शिंदे गटाने कंबर कसली होती. ऋतुजा लटके यांच्याविरोधात भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती. मात्र, मुरजी पटेल(Murji Patel) यांनी ऐनवेळी माघार घेतली, त्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात होता.

मात्र, मतदानाच्या काही दिवस आधी भाजपकडून पडद्यामागून ‘नोटा’चा प्रचार केला जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून केला जात होता. ऋतुजा लटके यांच्यापेक्षा ‘नोटा'(‘NOTA’) या पर्यायाला जास्त मते पडावीत, यासाठी पद्धतशीर आखणी केली जात असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे होते. दरम्यान, नोटाला ऋतुजा लटके यांच्यापेक्षा जास्त मते पडली नसली, तरी 12 हजार 776 इतकी मते मिळाली आहेत.

19 व्या फेरीअंती एकूण मतमोजणी-

ऋतुजा लटके – 66 हजार 247;

बाळा नाडार – 1 हजार 506;

मनोज नायक – 888;

मीना खेडेकर – 1 हजार 511;

फरहान सय्यद – 1 हजार 087;

मिलिंद कांबळे – 614;

राजेश त्रिपाठी – 1 हजार 569;

नोटा – 12 हजार 776;

एकूण मतमोजणी – 86198.