
जातीअंत संघर्ष समितीने म्हाडाकडे केली निवाऱ्याची मागणी
दीपक पवार
मुंबई : (Mumbai) मुंबईतील जोगेश्वरी(Jogeshwari) येथे महात्मा जोतिबा फुले, मागासवर्गीय शासकीय वसतिगृहाचे विद्यार्थी वाऱ्यावर पडले आहेत. या विद्यार्थ्यांना तात्काळ निवारा मिळावा, अशी मागणी जातीअंत संघर्ष समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तसेच, या विद्यार्थ्यांना म्हाडातर्फे तात्काळ निवारा उपलब्ध करून देण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
जोगेश्वरीमधील हे सरकारी वसतिगृह(hostel) कोणत्याही क्षणी कोसळून अपघात होईल, म्हणून ७ नोव्हेंबरपासून येथील विद्यार्थी उपोषण करीत आहेत. संबंधित शासकीय वसतिगृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा व हलगर्जीपणामुळे वरील विद्यार्थी पडझड झालेल्या व मोडकळीस आलेल्या इमारतीत राहत होते. त्या बाबतीत वारंवार तक्रार करूनही अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने अखेर विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव उपोषण करावे लागत आहे, अशी माहिती जातीअंत संघर्ष समितीचे महाराष्ट्र निमंत्रक शैलेंद्र कांबळे व सुबोध मोरे यांनी दिली.
विद्यार्थ्यांना राहण्यासाठी इमारत मिळावी म्हणून, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, मुंबई उपनगर अधिकारी यांनी ९ नोव्हेंबरला म्हाडाला(MHADA) पत्र दिले आहे. विशेष बाब म्हणून पाहून, सदर पीडित उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना शक्यतो महापालिका के पूर्व वार्डहद्दीत इमारत तात्पुरती उपलब्ध करून द्यावी, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कार्यही नियमित सुरू होईल व नुकसान टळेल. समस्येकडे मानवतावादी व सहानुभूतीच्या दृष्टीने पाहून सोडविण्याचा प्रयत्न करावा, अशी विनंती जातीअंत संघर्ष समिती, महाराष्ट्रतर्फे म्हाडा आणि राज्य सरकार यांना करण्यात आली आहे, असे शैलेंद्र कांबळे यांनी सांगितले.