Kalyan : धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

0
257

नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

Indiagroundreport वार्ताहर
कल्याण : कल्याणमध्ये(Kalyan) नागरिकांच्या वस्तीत शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. मुंबई संजय गांधी नॅशनल पार्क बोरीवली पथकाने १० तासांच्या अथक परिश्रमानंतर या बिबट्याला(leopard) बेशुद्ध करून रेस्क्यू केले. बिबट्याला जेरबंद केल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

कल्याणमध्ये गुरुवारी पहाटे मानवीवस्तीत बिबट्या शिरल्याने एकच गोंधळ उडाला होता. कल्याण पूर्वेच्या चिंचपाडा भागात एका इमारतीत हा बिबट्या शिरला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा एकच गोंधळ उडाला होता. चिंचपाडा(Chinchpada) रोडवरील श्रीराम अनुग्रह टॉवर नावाच्या या इमारतीत हा बिबट्या शिरला होता. या बिबट्याने २ नागरिक आणि ३ जनावरांवर हल्ला केला. बिबट्या मानवीवस्तीत शिरल्यामुळे परिसरात एकच भीती पसरली होती.

बिबट्या वस्तीत शिरल्याची माहिती मिळाताच मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क, बोरीवली टीम(Sanjay Gandhi National Park, Borivali team) घटनास्थळी पोहोचली. या टीमने १० तासांच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला बेशुद्ध करून रेस्क्यू केले. रेस्क्यू करताना देखील या बिबट्याने वनविभागाच्या कर्मचारी आणि एका स्थानिकाला जखमी केले. मात्र वनविभाग, पोलीस, अग्निशमन दलांच्या मदतीने हा बिबट्या जेरबंद झाला आहे, त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.