Kalyan : पालिकेच्या पाणी देखभाल दुरुस्तीमध्ये ठराविक ठेकेदारांची मक्तेदारी!

0
293
Kalyan: Monopoly of certain contractors in municipal water maintenance repair!

शहर अभियंता विभागाकडून चौकशी सुरू
Indiagroundreport वार्ताहर
कल्याण : (Kalyan)
कल्याण-डोंबिवली पालिकेतील(Kalyan-Dombivli municipality) पाणी देखभाल दुरुस्तीचे काम काही वर्षांपासून प्रशासनाकडून पालिकेत मक्तेदारी असलेल्या ठराविक तीन भागीदार कंपन्यांना सोयीप्रमाणे दिले जाते. याप्रकरणात पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. कामाची गुणवत्ता प्रशासनाला मिळत नाही. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधित देखभाल दुरुस्ती कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या स्पर्धेतील नाशिक, कल्याण आणि अंबरनाथ येथील खासगी कंपन्यांनी कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे केली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन आयुक्तांच्या आदेशावरुन शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी निविदा प्रक्रियेची सर्व कागदपत्रे दाखल करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत.

कल्याणची फ्ल्युअड ऑपरेशन्स झेनन सोल्युशन्स, अंबरनाथची(Ambernath) सुप्रीम टेक्नाॅलाॅजी कंपनी, नाशिकची एक कंपनी यांनी या तक्रारी केल्या आहेत. या कंपन्यांनी आपल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, डोंबिवली(पूर्व) भागात रामचंद्रनगर सिनेमा जलकुंभ, नांदिवली, आयरे, पाथर्ली येथील तळटाकी आणि पंपगृह देखभाल, दुरुस्तीचे काम पाणीपुरवठा विभागाकडून दोन वर्षाच्या कालावधीसाठी काढण्यात आले होते. या कामाची निविदा प्रक्रिया करण्यात आली. परंतु, या कामाच्या निविदा प्रक्रियेत साखळी पद्धतीचा अवलंब(टेंडर रिंग) करुन स्पर्धात्मक, गुणात्मक पद्धतीचा अवलंब न करता मे. माना इलेक्ट्रिक ॲन्ड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, मे. एस. एस. इलेक्ट्रिकल वर्क्स या दोन एकमेकांच्या भागीदार कंपन्यांना निवीदेतील अटीशर्ती बदलून त्यांना ही कामे देण्यात आली आहेत.

मे. माना, मे. एस. एस. या दोन संयुक्त भागीदारातील कंपन्या आहेत. मोहने, बारावे येथे त्या भागीदारी पद्धतीने देखभालीची कामे करतात मे. विठ्ठलेश ही कंपनी मे. एस. एस. इलेक्ट्रिक यांच्याशी संबंधित कंपनी आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. डोंबिवली पूर्वेतील जलकुंभ देखभाल दुरुस्तीची कामे साखळी पद्धतीचा अवलंब करून (टेंडर रिंग) मे. एस. एस., मे. माना कंपन्यांना देण्यात आली आहेत. यामध्ये पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. गुणवत्तापूर्ण कामे होत नसल्याने कामाचा दर्जा निकृष्ट राहत आहे. या सगळ्या प्रकरणाची सविस्तर चौकशी करुन याप्रकरणी पालिकेेने आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार करावी. या चौकशीतून जी माहिती बाहेर येईल त्याआधारे पालिकेने संबंधित या कंपन्यांवर कारवाई सुरू करावी, असे तक्रारीत म्हटले आहे. पालिकेत साखळी पद्धतीचा अवलंब करण्यासाठी काही ठराविक व्यक्ती कार्यरत आहेत. याचीही चौकशी(investigation) करावी, अशी मागणी स्पर्धक मे. सुप्रीम, मे. अश्वमेध, मे. फ्ल्युअड कंपन्यांकडून करण्यात आली आहे.

प्रशासनाने(The administration) या कामाची निविदा प्रक्रिया काटेकोरपणे राबवून स्पर्धात्मक पद्धतीने या कामाचे वाटप केले आहे. या तक्रारीत कोणतेही तथ्य नाही, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांनी दिली. अनेकवर्ष पालिकेत आम्ही गुणवत्तापूर्ण सेवा देत आहोत. स्पर्धात्मक पध्दतीने आम्हाला पाणीपुरवठा देखभालीचे काम मिळाले आहे. यंत्र उत्पादक, पुरवठादार आणि पालिकेला २४ तास अखंड सेवा मिळेल अशा पद्धतीने आम्हाला स्पर्धात्मक पद्धतीने कामे मिळतात, अशी माहिती मे. माना इलेक्ट्रिकचे संचालक मनीष त्रिवेदी यांनी दिली. तर, पालिकेच्या ऑनलाईन निविदा प्रणालीच्या माध्यमातून आम्हाला कामे मिळाली आहेत. तक्रारदारांनी कामे मिळाली नाहीत, म्हणून आकसबुध्दीने तक्रार केली आहे, अशी माहिती मे. एस. एस. इलेक्ट्रिकचे संचालक संजय शहा यांनी दिली.