
दीपक पवार
मुंबई : ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी होण्यासाठी आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील स्थानिक पातळीवरील समस्यांना घेऊन आंदोलन निश्चित करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभा, मूरबाड तालुका समिती यांची जनरल बॉडी बैठक लक्ष्मण भांडे यांच्या घरी, देवगाव, ता. मूरबाड(Moorbad) येथे घेण्यात आली. या बैठकीत अनेक विषयांना घेऊन अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली ३ दिवसीय ठिय्या आंदोलन करण्याची हाक देण्यात आली, अशी माहिती सरपंच डॉ. कविता वरे यांनी दिली.
सदर बैठकीस तालुका समितीमधील सदस्य व सिटू(SITU) संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते. या बैठकीत २३ ते २५ नोव्हेंबर २०२२ असे तीन दिवसीय ठिय्या आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले. आंदोलनाच्या प्रचारासाठी व दरम्यान सभासद नोंदणी करण्यासाठी गाव बैठका घेण्याचे ठरविण्यात आले आहे. ही बैठक कॉ. डॉ. कविता वरे, कॉ. दिलीप कराळे, कॉ. दिनेश जाधव व कॉ. लक्ष्मण भांडे यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडली.


