
एका आरोपीवर राज्यभरात गुन्हे आहेत दाखल!
मुकुंद लांडगे
मुंबई : (mumbai)जास्त पैसे देण्याच्या आमिषाने बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा माटुंगा पोलिसांनी(Matunga police) पर्दापाश केला असून, याप्रकरणी ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. देवराव भाऊराव हिवराळे, रवीकांत जनार्दन हिवराळे आणि योगेश वासुदेव हिवराळे अशी त्यांची नावे आहेत. यातील देवराम याच्यावर नाशिक, फलटण, शेगाव आणि खामगाव पोलीस ठाण्यात असे पूर्वीचे गुन्हे दाखल असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी सांगितले.
आपण इन्कम टॅक्स अधिकारी(Income Tax officer) असून, टाकलेल्या धाडीत ताब्यात घेतलेल्या नोटा असून त्या बदलून देतो, असे सांगत २० लाखांचे तब्बल ४० लाख रुपये देतो, अशी बतावणी करीत मुंबईतील फिर्यादीला विश्वास दिला. त्यासाठी या टोळीने फिर्यादीला ओबेरॉय(Oberoi), ट्रायडांत, प्रीतम अशा महागड्या हॉटेलांत आपल्याकडील महागड्या कारमधून फिरविले. यानंतर फिर्यादीचा विश्वास संपादन करून २० लाख रोकड घेतली. मात्र, या नोटांवर ‘भारतीय बच्चे का बँक’ असे लिहिलेल्या बनावट नोटा देऊन फसवणूक केली. त्यामुळे याबाबत माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, सहआयुक्त(कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील, मध्य प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, परिमंडळ-४ चे पोलीस उपआयुक्त प्रणय अशोक, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त कल्पना गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी तपास करून अखेर या टोळीच्या मुसक्या आवळल्या.
दरम्यान, याबाबत माटुंगा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल गौड, गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे उपनिरीक्षक प्रशांत कांबळे यांच्यासह अंमलदार जयेंद्र सुर्वे, विनायक मुंडे, संतोष पवार, यशवंत घाडगे, किशोर देशमाने, हनुमान मेटकर, देवेंद्र बहादूरे, प्रशांत महाले आणि सुनील आंधळे यांनी याप्रकरणी तपास करून आरोपींना अटक केली(arrested).
माटुंगा पोलिसांनी अटक केलेल्या देवराव हिवराळे(रा. चितोड, बुलढाणा) याच्यावर नाशिक, फलटण- सातारा, शेगाव-बुलढाणा आणि खामगाव-बुलढाणा पोलीस ठाण्यात अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत.