
दोघेजण बचावले
मुंबई : आज (मंगळवार) सायंकाळी पावणेपाच वाजता माटुंगा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर रोडवर एल मित्तल कंपनीच्या कारला अचानक आग लागली. त्यामुळे तातडीने आतील दोघेजण खाली उतरले. त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. माटुंगा भागातील डॉ बाबासाहेब आंबेडकर रोडवरून दुळभुळे पुलावरून ही गाडी जात असताना अचानक धूर येऊ लागला. त्यात अवंती मिर्झा नामक गाडीची मालकीण आणि शिवबहादूर हा चालक होता. ते ठाण्याहून मलबार हिल्सकडे आपल्या घरी परतत होते. मात्र दुळभुळे रस्त्यावरून जात असताना भर रस्त्यावरच अचानक गाडीतून धूर येऊ लागला. त्यामुळे गाडी जागीच चालकाने थांबवून अवंती मिर्झा यांना खाली उतरण्यास सांगितले. तोही बाहेर पडत असतानाच काही सेकंदातच या गाडीला आग लागली. दरम्यान, हा प्रकार कळताच माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी यावेळी अग्निशमन दलालाही पाचारण केले.मात्र ते आग विझवत असताना कार जळून राख झाली. यामुळे रोडवरील वाहतूक तब्बल ३० मिनिटे खोळंबली.
या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र सुमारे २५ ते ३० लाखांच्या गाडीचे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेचे कारण आम्ही शोधत आहोत..दीपक चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, माटुंगा पोलीस ठाणे.


