
Indiagroundreport वार्ताहर
वॉशिंग्टन : अमेरिकेत बेधुंद गोळीबाराच्या घटना वारंवार घडत आहेत. अमेरिकेच्या वर्जिनिया प्रांतात अशीच एक गोळीबाराची घटना घडली आहे. वॉलमार्टच्या एका स्टोरमध्ये(Walmart store) ही घटना घडली असून, गोळीबारात आतापर्यंत १० जण ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
या घटनेसंबंधी शहरातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली. अमेरिकेच्या वर्जीनिया(Virginia) येथील वॉलमार्टच्या एका स्टोरमध्ये बंदूकधारी व्यक्तींनी नागरिकांवर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात अनेक जण मारले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावेळी गोळीबार करणारा शूटरही मारला गेला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत १० नागरिकांचा या घटनेत मृत्यू झाल्याची शक्यता आहे. चेसापीक पोलिसांनीही वॉलमार्टच्या स्टोरमध्ये गोळीबार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
अमेरिकेच्या डलास(Dallas) आणि कॅलिफोर्नियामध्येही(California) गोळीबाराच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये एकूण तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. डलासमध्ये शनिवारी रुग्णालयात गोळीबार झाला. त्यात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत संशयित बंदूकधारीही जखमी झाला आहे.
मेथोडिस्ट हेल्थ सिस्टम रुग्णालयात(Methodist Health System Hospital) ही घटना घडली. शनिवारी सकाळी ११ वाजता हा प्रकार घडला. रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी यासंबंधी जबाब दिला आहे. मेथोडिस्ट हेल्थ सिस्टमचा एक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचला. त्याने संशयित बंदूकधाऱ्याशी लढा दिला. त्याच्यावर गोळीबार केला. त्यात तो जखमी झाला.