
उल्हासनगर : उल्हासनगरमधील हिराघाट रस्त्याकडून डर्बी चौककडे येणाऱ्या गोशाळा जवळ सेक्शन 17, उल्हासनगर 3 या मार्गावर नाली व साकव बांधण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणारी जड अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. त्यामुळे 2 डिसेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे. वाहतुकीत बदल पुढील प्रमाणे आहे.
प्रवेश बंद – पवई चौक, उल्हासनगर 3 रस्त्याकडून डर्बी चौक कडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना बोट क्लब हिराघाट उल्हासनगर 3 येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – पवई चौक, उल्हासनगर 3 कडून हिराघाट कडे येणाऱ्या सर्व वाहनांना बोट क्लब, हिराघाट, उल्हासनगर 3 येथून डावीकडे वळण घेवून पंचशील नगर, काजल पेट्रोल पंप, स्मशानभूमी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
सदरची वाहतूक अधिसूचना दि. 02 डिसेंबर 2022 रोजी ते दि. 25 डिसेंबर 2022 रोजी पर्यंत अमलात राहील. सदरची वाहतूक अधिसुचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रूग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही, असे उपायुक्त डॉ. राठोड यांनी कळविले आहे.


