Thane : ‘त्या’ तलावाच्या सुशोभिकरणाचे काम सुरू न करणाऱ्या कंत्राटदाराला ठामपाची नोटीस

0
166

आयुक्त अभिजीत बांगर यांनी केला तीन हात नाका ते वागळे इस्टेट या भागाचा पाहणी दौरा
समर प्रताप सिंग
ठाणे : (Thane)
रायलादेवी तलावाच्या सुशोभिकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम ठाणे महानगरपालिका करणार आहे. त्याचा कार्यादेश दिला असला, तरी कंत्राटदाराने काम तर सुरू केलेले नाहीच, शिवाय आयुक्त अभिजीत बांगर यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान तलावाजवळ एकही कामगार हजर नव्हता, त्यामुळे हे काम का सुरू झाले नाही. याचा खुलासा करण्याची नोटीस कंत्राटदाराला बजावण्यात आली आहे.

रायलादेवी तलावाच्या सुशोभिकरणाचे काम तीन टप्प्यात केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ठाणे महापालिका, दुसऱ्या टप्प्यात एमएमआरडीए आणि तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारच्या अमृत योजनेत काम होणार आहे. पहिल्या दोन्ही टप्प्यांची कामे सुरू होणे अपेक्षित होते. ती कामे सुरू न झाल्याने आयुक्त अभिजीत बांगर यांनी पालिकेच्या कंत्राटदारांस नोटीस बजावण्याचे आदेश दिले. या कामासाठी कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही. तसेच, सगळी कामे विहित मुदतीत पूर्ण व्हायला हवी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. त्याचवेळी, एमएमआरडीएसोबत पाठपुरावा करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

तीन हात नाका ते वागळे इस्टेट या भागाचा आयुक्त अभिजीत बांगर यांनी बुधवारी पाहणी दौरा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून सुरू असलेल्या धर्मवीर चौक येथील काँक्रीटीकरणाच्या कामाची पाहणीही आयुक्तांनी यावेळी केली.

आयुक्तांनी या आधीच्या पाहणी दौऱ्यात तीन हात नाका येथील चौकात मध्यभागी असलेले सीसीटीव्हीचे खांब, वायरींचे जाळे योग्य ठिकाणी हलविण्याच्या सूचना दिल्या होत्या. ते काम पूर्ण झाले असून, चौक मोकळा झाला आहे. आता त्याच्या सुशोभिकरणास सुरूवात होईल, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले. वाहतूक पोलिसांनी एका चौकीचीही मागणी यावेळी आयुक्तांकडे केली. त्यावर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

तीन हात नाका येथे जागोजागी कचरा पडलेला होता. तो पाहून स्वच्छता काटेकोरपणे करण्याची सूचना आयुक्तांनी दिली. तसेच, भंगारात पडलेली वाहने उचलण्यासाठी वाहतूक पोलिसांना मदत करण्याच्या सूचना परिमंडळ उपायुक्त शंकर पाटोळे यांना दिल्या.

डेब्रिज टाकण्याची प्रवृत्ती

श्रीनगर भागात एका मंगल कार्यालयाजवळ पडलेली डेब्रिज तातडीने हटविण्यास आयुक्तांनी सांगितले. तसेच, वागळे इस्टेटमधील एका रस्त्याचे काम सुरू असताना त्याची डेब्रिज दुसरीकडे टाकल्याबद्दल नोटीस बजावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. एकंदर शहरात बेशिस्तपणे डेब्रिज टाकण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर दिसते. त्याबाबत प्रभाग समिती कार्यालयांनी दक्ष रहायला हवे, दंड आकारून ही प्रवृत्ती मूळातच कमी व्हावी म्हणून प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.

पगार वेळेत होतो का?

ॲपलॅब कंपनीच्या चौकात काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांशी आयुक्त अभिजीत बांगर यांनी संवाद साधला. पगार वेळेवर मिळतो का?, हातमोजे, गणवेश, मिळतात का?, असे प्रश्न आयुक्तांनी त्यांना विचारले. त्यावर, पगार मागेपुढे होतो, वेळेत मिळत नाही, अशी व्यथा त्या कंत्राटी सफाई कामगारांनी मांडली. शिवाय, हातमोजे आणि गणवेशाशिवाय काम करावे लागते, असेही ते म्हणाले. आयुक्त अभिजीत बांगर यांनी याची दखल घेतली आणि पगार, गणवेश, हातमोजे आदी वेळेत मिळण्याबद्दल ताबडतोब उपाययोजना करण्याचे निर्देश उपायुक्त (घनकचरा) यांना दिले.

नाले वेळच्यावेळी साफ करावेत

किसननगर परिसरात पाहणी करताना नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा आयुक्तांच्या निदर्शनास आला. तीच स्थिती, वागळे इस्टेटमधील लोढा सुप्रीमस शेजारील मोठ्या नाल्याची होती. एकंदर परिस्थिती पाहता नालेसफाई झाली की नाही?, असा प्रश्न उपस्थित झाला. या अस्वच्छतेची दखल घेऊन ताबडतोब नालेसफाई करण्याचे आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

त्याचवेळी, पावसाळ्याशिवाय, वेळोवेळी नालेसफाई झाली पाहिजे, अशी भूमिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मांडली. प्रत्येक नाल्यावर दोन्ही बाजूंनी जाळी बसवावी. यासाठी लवकरच शहरभर मोहीम हाती घेतली जाणार आहे. तसेच, नाल्यावर जेथे कल्व्हर्ट असेल त्याचा बाजूला प्रवाहाच्या दिशेने स्क्रीन(जाळी) बसवली जावी, जेणेकरून पाण्यावर तरंगणारा कचरा जाळीला अडकेल आणि शहरात शिरणारा नाला, शहराबाहेर पडेपर्यंत घनकचरा मुक्त करणे शक्य होईल, अशी व्यवस्था लवकरच सर्व नाल्यांवर करण्याचे सूतोवाच आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले.

शौचालयांची स्थिती गंभीर

मुख्य रस्त्यापासून ते आडवळणाच्या वस्तीपर्यंत सगळीकडे आयुक्तांनी शौचालयांची पाहणी केली. चेक नाका परिसरातील ‘सुलभ’चे व्यवस्थापन असलेल्या शौचालयांपासून ते वागळे इस्टेटमधील वस्तीतील शौचालयांची स्थिती खूप गंभीर असल्याचे निरीक्षण आयुक्तांनी नोंदविले. तसेच, आंबेवाडी येथील शौचालयाच्या अस्वच्छतेबद्दल स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता निरीक्षक, कंत्राटदार यांना नोटीसही बजाविण्यात आली.

शौचालये स्वच्छ असणे, लादी कोरडी असणे, पाण्याची गळती नको, कड्याकोयंडे नीट असणे, व्यवस्थित देखभाल करणे, हात धुण्यासाठी साबण उपलब्ध असणे, तसेच महिलांच्या शौचालयात सॅनिटरी पॅड व्हेंडिग मशीन आणि कचरापेटी असणे, यावर आपला कटाक्ष आहे. याचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.
नागरिकांची व्यथा

रामनगर येथील धर्मवीर चौक येथे आयुक्त अभिजीत बांगर पाहणी करीत असताना काही नागरिकांनी सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाईन वारंवार तुंबत असल्याची तक्रार केली. आयुक्तांनी त्या भागाची पाहणी केली आणि तत्काळ या पाइपलाईनच्या दुरुस्तीचे आदेश दिले. संबंधित यंत्रणेने ते काम सुरूही केले.

तसेच, रामनगर येथील वरच्या भागात शौचालय नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यावर तिथे ताबडतोब कंटेनर प्रकारचे शौचालय देण्याचे आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले.

Thane: Thampa notice to contractor for not starting 'that' lake beautification work

रंग आणखी प्रभावी

जुन्या पासपोर्ट कार्यालयाजवळची भिंत प्रभावी रंगांमुळे उठावदार झाली आहे. त्याविषयी आयुक्त अभिजीत बांगर यांनी समाधान व्यक्त केले. त्याचवेळी, रायलादेवी तलावाच्या प्रवेशद्वारावरील भिंतींचा रंग आणखी प्रभावी हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

याच परिसरात रस्त्याचे काम चांगले नसल्याचे निरीक्षण आयुक्तांनी नोंदविले. जंक्शनच्या उतारावरील खड्डे बुजविताना केलेले पॅचवर्क उंच सखल झाले आहे. ते तत्काळ दुरुस्त करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले.