San Francisco : आयफोन अनलॉक करणाऱ्या पहिल्या हॅकरला मिळाली ट्विटरमध्ये 12 आठवड्यांची इंटर्नशिप

0
189

Indiagroundreport वार्ताहर
सॅन फ्रान्सिस्को : २००७ साली जॉर्ज हॉट्झ(George Hotz) याने आयफोन यशस्वरित्या अनलॉक करून दाखविला आणि त्यानंतर सॉफ्टवेअरसह हार्डवेअरमध्येही बदल करण्याची वेळ ॲपलवर आली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यामुळेच ॲपल आयफोनचे पुढचे व्हर्जन वेळेआधीच बाजारात आणण्याची नामुष्कीही ॲपलवर ओढवली. त्याच हॉट्झ याला आता ट्विटरच्या इलॉन मस्क यांनी आगळीवेगळी ऑफर दिली आहे.

ट्विटरचे मुख्यालय असलेल्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये १२ आठवड्यांची इंटर्नशिप हॉट्झला दिली आहे. या इंटर्नशिपदरम्यान जॉर्ज ट्विटर सर्चवर काम करणार आहे. त्याने त्याच्या ट्विटर पोस्टमध्ये याचा थेट उल्लेखच केला आहे. गुगल सर्चसारखा ट्विटर सर्चचा वापर लोक करू लागतील, अशा प्रकारचे बदल त्यात करणे हे आपले लक्ष्य असल्याचे त्याने म्हटले आहे.

ट्विटरचे अधिग्रहण केल्यानंतर इलॉन मस्क यांनी सुरुवातीस कंपनीतील अतिवरिष्ठांना घरचा रस्ता दाखविला आणि त्यानंतर लगेचच अर्ध्याहून अधिक कर्मचारी वर्ग घरी पाठविला. त्याचा फटकाही कंपनीला बसला आणि ट्विटरचे अनेक ग्राहक सोडून गेले, सेवा संथ झाली. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांना परतण्याचा आग्रहही ट्विटरने करून झाला. अनेकांनी त्यास सपशेल नकार दिला. आता ट्विटरचे रुतलेले चाक बाहेर काढण्याचा प्रयत्न मस्क यांनी सुरू केला असून त्याचसाठी हॉट्झ याला ही ऑफर दिली आहे.