
Indiagroundreport वार्ताहर
रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर(Mumbai-Pune Expressway) डांबराच्या टँकरला आग लागल्याची घटना घडली आहे. खोपोलीजवळ बोरघाटात अंडा पॉइंटजवळ धावत्या टँकरला ही आग लागली होती. काही क्षणात टँकरने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच खोपोली नगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.
या बर्निंग टँकरचा(tanker) थरार प्रवासी आणि वाहनचालकांनी आज एक्स्प्रेस वेवर अनुभवला. ही दुर्घटना निदर्शनास येताच टँकर चालकाने टँकर बाजूला घेतला, त्यानंतर तातडीने बचाव पथकांना पाचारण करण्यात आले.
देवदूत यंत्रणा, आयआरबी पेट्रोलिंग, बोरघाट वाहतूक पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल होते. दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, सर्वांच्या मदतीने तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
महामार्गावरच टँकरने पेट घेतल्याने याचा वाहतुकीवरही परिणाम झाला होता. काहीवेळ वाहतुकीचा वेग मंदावला होता. आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर वाहतूक(traffic) देखील आता सुरळीत सुरु झाली आहे.


