
Indiagroundreport वार्ताहर
परभणी : अखिल भारतीय भिक्खु महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव पूज्यभदन्त उपगुप्त महास्थवीर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर(Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या अत्यंत दुर्मिळ असलेल्या अस्थींचा कलश कायमस्वरूपी रविवारी सन्मानपूर्वक परभणीत आणण्यात येत आहे.
स्वातंत्र्यसेनानी दलित मित्र भाऊसाहेब बी. एस. मोरे फाऊंडेशन औरंगाबादच्यावतीने परभणी(Parbhani) येथील नालंदा विपश्यना केंद्रास हा अस्थिकलश सभारंभपूर्वक प्रदान करण्यात आला आहे. हा अस्थिकलश घेवून टीम नालंदा रविवारी सायंकाळी चार वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहचणार आहे. याप्रसंगी समता सैनिक दलाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मानवंदना देण्यात येणार आहे. तेथून हा अस्थींचा कलश भव्य मिरवणुकीने रवीराज पार्क येथील नालंदा विपश्यना केंद्रापर्यंत आणण्यात येत आहे. त्याठिकाणी अस्थिकलशचा सन्मान आणि दर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पूज्य भदन्त सरनानंद महास्थवीर, भदन्त मुदितानंद थेरो, भदन्त खेतबोधी, भदन्त प्रज्ञाबोधी, भदन्त धम्मपाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रविवारी दुपारी चार वाजता शुभ्र वस्त्र परिधान करून मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन नालंदा विपश्यना केंद्राचे(Nalanda Vipassana Center) अध्यक्ष करण गायकवाड, उपाध्यक्ष प्रा. डॉ. अरूणकुमार लेमाडे, सचिव भीमप्रकाश गायकवाड, कोषाध्यक्ष डॉ. आनंद मनवर, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती 2022 चे अध्यक्ष कपिल शिरडकर ढेंबरे, धम्मज्योती महिला मंडळाच्या अध्यक्षा ललिता वाव्हळे व टीम नालंदा यांच्यावतीने करण्यात आले आहे.