
Indiagroundreport वार्ताहर
पालघर : टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री(Cyrus Mistry) यांच्या अपघातप्रकरणी गाडी चालविणाऱ्या प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनाहिता पंडोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्योगपती सायरस मिस्त्री अपघात प्रकरणात दोन महिन्यांनंतर पालघरच्या कासा पोलीस ठाण्यात कलम 304(अ), 279, 337, 338 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुजरातहून मुंबईकडे कारने येत असताना पालघरमधील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी येथे भीषण अपघात झाला होता. या अपघातात सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर डॉ. अनाहिता पंडोले(Dr. Anahita Pandole) आणि त्यांचे पती डेरियस पंडोले गंभीर जखमी झाले होते. अपघात झाला त्यावेळी मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनाहिता पंडोले या कार चालवित होत्या. हा अपघात झाला तेव्हा सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले कारमध्ये मागच्या सीटवर बसले होते. तर, अनाहिता पंडोले आणि डेरियस पंडोले पुढे बसले होते.
याप्रकरणी पोलिसांनी माहिती देताना सांगितले होते की, मागे बसलेले मिस्त्री आणि जहांगीर पंडोले या दोघांनीही सीट बेल्ट लावलेला नव्हता. यासोबतच मर्सिडीजने मुंबईपासून १२० किमी अंतरावर असलेल्या पालघरमधील(Palghar) चारोटी चेकपोस्ट पार केल्यानंतर नऊ मिनिटांत २० किमी अंतर कापले होते. म्हणजेच गाडीचा वेगही जास्त होता. हा अपघात घडल्यानंतर पंडोले पती-पत्नी गंभीर जखमी असल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत होते. सध्याही डॉ. अनाहिता पंडोले या रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत असून, त्यांचे पती डेरिअस पंडोले यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पालघर पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन या अपघातासंदर्भात अपघाताच्या दोन महिन्यांनंतर त्यांचा जबाब नोंदवून घेतला. त्याआधारे आज कासा पोलीस ठाण्यात(Kasa police station) निष्काळजीपणाने वाहन चालविणे धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करणे आणि सहप्रवाशांनी सीट बेल्ट लावला नसतानाही वाहन भरधाव वेगात चालविणे, असे ठपके ठेवत डॉ. अनाहिता पंडोले यांच्यावर हा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पालघर पोलीस करीत आहेत.


