
फलंदाज सूर्यकुमार यादवने रचला इतिहास
Indiagroundreport वार्ताहर
नवी दिल्ली : भारताने(India) झिम्बाब्वे विरुद्धच्या आजच्या सामन्यात वीस षटकात 186 धावा ठोकल्या. या विशाल धावांचा डोंगर रचण्यात सूर्यकुमार यादवचा सिंहाचा वाटा होता.
भारतीय क्रिकेट संघात 360 डिग्री प्लेयर म्हणून छाप टाकलेल्या सूर्यकुमार यादवने आज पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज फलंदाजीचा जलवा दाखविला. अवघ्या 25 चेंडूत 61 धावांची नाबाद खेळी करून सूर्यकुमारने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडविला. टी-20 वर्ल्डकप 2022 मध्ये तीन अर्धशतक ठोकून सूर्यकुमारने यंदाच्या टी-20 क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 1000 धावा करणार सूर्यकुमार यादव(Suryakumar Yadav) हा भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे.

भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने मैदानात चौफेर फटकेबाजी करून टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला. मैदानात सर्वच दिशेला आक्रमक फटके मारून सूर्यकुमारने धावांचा डोंगर रचला. यासोबतच अप्रतिम फूटवर्कने भल्या भल्या गोलंदाजांना घाम फोडायला लावणारा सूर्यकुमार यादव आसीसी रॅंकिगमध्येही चमकला आहे.
टी-20 क्रिकेटच्या जागतिक स्तरावर सूर्यकुमार यादव एका वर्षात एक हजार धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. पाकिस्तानचा सलमीवीर फलंदाज मोहम्मद रिझवानने(Mohammad Rizwan) 2021 साली जागतिक स्तरावर एका वर्षात हजार धावा करण्याचा करिष्मा केला होता, त्यानंतर 2022 मध्येही त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक हजार धावा करणारा जगातील पहिल्या फलंदाजाचा मान पटकाविला होता.


