
Indiagroundreport वार्ताहर
नवी दिल्ली : आफताबच्या वकिलांनी मंगळवारी आणखी एक नवा खुलासा केला आहे. आफताबने कोर्टात श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली नाही, असे वकिलांचे(Lawyer) म्हणणे आहे.
श्रद्धा वालकर(Shraddha Walker) प्रकरणात रोज नवीन खुलासे होत असले, तरी त्यांचा उलगडा होताना काही दिसत नाही. या प्रकरणातील गुंतागुंत सुटण्याऐवजी दिवसागणिक ती वाढतच चालल्याचे दिसते. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना आफताबचे वकील अविनाश कुमार यांनी सांगितले की, आफताब दिल्ली पोलिसांना तपासात संपूर्ण सहकार्य करीत आहे, मात्र त्याने कोर्टात गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. श्रद्धाची हत्या केल्याची कबुली त्याने दिलीच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीतील(Delhi) एका फ्लॅटमध्ये श्रद्धा वालकरची निर्घृणपणे हत्या करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून ते फेकून दिल्याचा आरोप तिचा प्रियकर आफताब पूनावाला याच्यावर आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली. दिल्ली पोलिसांना मात्र या हत्येशी संबंधित एकही ठोस पुरावा अद्याप सापडलेला नाही.
श्रद्धा हत्या प्रकरण उघड झाल्यानंतर यातील संशयित आरोपी आफताब आणि त्याच्याशी संबंधित रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत, पण आफताब पोलिसांची दिशाभूल करीत असल्याचे आतापर्यंतच्या तपासावरून दिसून येत असल्याचे मानले जाते. आफताबने सांगितलेल्या ठिकाणांवर शरीराचे काही अवयव सापडले असले तरी ते श्रद्धाचे आहेत का? आणि मारेकरी आफताबच आहे का? हे सिद्ध झालेले नाही. तसेच, श्रद्धाने घातलेले कपडेही अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. आफताब दिशाभूल करीत असल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.
आफताबने आतापर्यंत पोलिसांना जी माहिती दिली आहे, त्यानंतर पोलिसांनी त्याच्या नार्को चाचणीसाठी कोर्टाकडे परवानगी मागितली होती. या घटनेमागचे सत्य समोर येण्यासाठी त्याची चाचणी करण्यात येणार आहे. कोर्टानेही तशी परवानगी दिली आहे. या नार्को चाचणीआधी त्याची पॉलिग्राफ चाचणी करण्यात येणार आहे. मंगळवारी आफताबची १० दिवसांची पोलीस कोठडी संपली. त्यानंतरही ठोस पुरावे किंवा चौकशीत काही ठोस हाती न लागल्याने कोर्टाकडून पोलिसांनी चार दिवसांची पोलीस कोठडी(police custody) वाढवून घेतली आहे.


