
भाषण सुरू असताना अचानक आली भोवळ
Indiagroundreport वार्ताहर
सिलिगुडी : (Siliguri) केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांची अचानक तब्येत बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांची तब्येत बिघडल्याची माहिती आहे. सिलिगुडी येथे भाषण करीत असताना हा प्रकार घडला. नितीन गडकरी यांना अचानक भोवळ आली आणि ते खाली बसले, त्यानंतर नजिकच्या रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक कार्यक्रमस्थळी रवाना झाले.
शरीरातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे नितीन गडकरी यांची प्रकृती खालावली असल्याची प्राथामिक माहिती मिळत आहे. सध्या नितीन गडकरी यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) यांनी सुद्धा नितीन गडकरी यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारणा केली.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे पश्चिम बंगाल(West Bengal) दौऱ्यावर आहेत. ते आज सिलीगुडीतील शिवमंदिर ते सेवक छावणीपर्यंतच्या रस्त्याच्या उद्धघाटनासाठी आले होते. यावेळी दार्जिलिंग जंक्शनजवळील डागापूर मैदानात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंचावर नितीन गडकरी यांची उपस्थिती होती.
दरम्यान, अचानक भाषण करीत असताना नितीन गडकरी यांना मंचावरच भोवळ आली आणि ते खाली बसले. नितीन गडकरी यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे कार्यक्रमस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. या सगळ्यानंतर नितीन गडकरी यांना भाजपचे स्थानिक खासदार राजू बिस्टा(Raju Bista) यांच्या निवासस्थानी नेण्यात आले.

दरम्यान, स्थानिक डॉक्टरांच्या पथकाने नितीन गडकरी यांच्यावर प्राथामिक उपचार(primary treatment) केले. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. आता गडकरी लवकरच दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती आहे.


