Mumbai : होय मी बदला घेतला, बेईमानाला जागा दाखविलीच पाहिजे : देवेंद्र फडणवीस

0
205

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : शिवसेनेला(ठाकरे गट) उद्देशून देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी म्हटले की, माझ्यासोबत तुम्ही बेईनामी कराल तर होय मी बदला नक्कीच घेईन.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होण्यात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. भाजप-शिवसेनेची युती(BJP-Shiv Sena alliance) तुटल्यानंतर अडीच वर्षात मनात जे काही साचले होते ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बोलून दाखविले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुमच्यासोबत २४ तास राहणारा व्यक्ती, तुमच्यासोबत सत्ता भोगणार व्यक्ती, तुमच्यासोबत निवडून आलेला व्यक्ती हा थेट तुमच्या पाठीत खंजीर खुपसतो, त्यावेळी राजकारणात(politics) जिवंत राहून त्याला ते परत करावे लागते, नाहीतर तुम्ही राजकारणात जगता येत नाही. राजकारणात चांगलेच राहिले पाहिजे. पण, तुमच्या चांगुलपणाचा कुणी फायदा घेत असेल, तर बेईमानाला जागा दाखवलीच पाहिजे. त्यामुळे होय मी बदला घेतला आणि मला त्याचा अभिमान आहे.

उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी स्वत:चे नुकसान करून घेतले आहे. माझी आणि उद्धव ठाकरे यांची वैयक्तिक दुश्मनी नाही. आम्ही राजकीयदृष्ट्या दूर गेलो, पण आता मनही जवळ येणार नाही. आता आम्ही यापुढे कधीही एकत्र येणार नाही, तशी परिस्थिती नाही. राजकारणात कुणीही कोणाला संपवू शकत नाही. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपला पूर्णपणे बहुमत मिळेल, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

शिवसेनेसोबत युती करण्याची कोणतीही परिस्थिती सध्या नाही, कारण आता मनं दुखावली आहेत. दोन पक्ष कॉमन मिनिमम प्रोग्रामवर(common minimum program) एकत्र येऊ शकतात. मात्र, मनं दुखवली असताना हे शक्य होणार नाही. उद्धव ठाकरे आणि आम्ही एकत्र बसू, पण कार्यकर्त्यांना ते मान्य होणार नाही. कार्यकर्त्यांनी अडीच वर्षात जे भोगलंय, निवडून आल्यानंतर विरोधी पक्षात बसलेत. आमचा रोज होणार अपमान त्यांनी पाहिलाय. दोन-अडीच वर्षात माझा वैयक्तिक अपमान करण्याची कोणतीही संधी त्यांनी सोडली नाही. मात्र, आता आम्ही पुढे गेलो आहोत. आता आम्ही मोठे आहोत, ते लहान आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.