
मुंबई : मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यातील तब्बल १७५ पोलीस निरीक्षकांना अखेर पदोन्नती मिळाली आहे. ते ग्रामीण भागात उपाधीक्षक तर शहरी भागात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. यामुळे निवृत्तीच्या उंंबरठ्यावर असलेल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या वर्षभरापासून हे सर्व अधिकारी पदोन्नतीच्या प्रतिक्षेत होते. तर मुंबई सह ठाणे, पालघर जिल्ह्यासह रायगड, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती येथील १९९१ ते ९३ या बॅचचे सुमारे १७५ पोलीस अधिकारी हे सरळसेवा भरतीने पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरती झाले होते. त्यानंतर सुमारे १० ते १५ वर्षानंतर या अधिकाऱ्यांना विविध पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून बढती मिळाली होती. मात्र नियमानुसार, पोलीस निरीक्षक म्हणून १० वर्ष कालावधी पूर्ण केल्यानंतर बढती मिळून त्यांची साहाय्यक पोलीस आयुक्तपदी किंवा उपाधिक्षक पदी बढती मिळणे आवश्यक असतानाही ते वंचित होते. या अधिकाऱ्यांना साहाय्यक पोलीस आयुक्तपदी असलेल्या अधिकाऱ्याचे वेतन मिळत आहे. याबाबत काही पोलीस अधिकाऱ्यांनी गृहविभागाकडे पाठपुरावाही केला होता.
त्यामुळे सुमारे दोन महिन्यांपूर्वी विभागीय पदोन्नती समितीने (डी.पी.सी.) पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांची नावांची यादी गृह विभागास दिली होती. यानंतर आता गृह विभागाने तात्काळ ही यादी सामान्य प्रशासन विभागास दिली होती.