Mumbai : महिलांचा अवमान करणाऱ्यांना संविधानिक पदावर स्थान नको

0
174

महिला लोकप्रतिनिधींची राज्यपालांकडे मागणी

दीपक कैतके
मुंबई : महिलांबाबत आक्षेपार्ह शब्द उच्चारून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्राच्या संविधानिक पदावर राहता येऊ नये, अशी तरतूद करावी. तसेच, अशा व्यक्तींनी अशी हमी त्यांनी शपथ ग्रहण करताना घेणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी महिला लोकप्रतिनिधींनी सोमवारी राज्यपाल(Governor) भगतसिंह कोश्यारी यांना भेटून केली.

या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासून स्त्रित्वाचा अपमान करणाऱ्या सत्ताधारी सरकारमधील स्त्रीविरोधकांना समज देऊन महाराष्ट्राची स्त्री सन्मानाची संस्कृती अबाधित राखण्यास सहकार्य करावे, अशी विनंती या लोकप्रतिनिधींनी राज्यपालांना केली आहे.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा एकेरी उल्लेख करीत आक्षेपार्ह शब्द वापरला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने त्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलन करीत सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही महिलांचा अवमान केल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा सदस्या फौजिया खान, समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांच्या नेतृत्वाखालील महिला लोकप्रतिनिधींनी आज राजभवनावर जाऊन कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले.

राज्यातही समस्त स्त्रिया आज अत्यंत दिमाखाने विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. पुरोगामी महाराष्ट्राचे(Maharashtra) हे अभिमानास्पद चित्र आहे, परंतु जाहीरपणे आपल्या भाषणातून, वक्त्यव्यातून समस्त स्त्री जातीलाच हीन वागणूक देऊन तुच्छ लेखून त्यांची सातत्याने अवहेलना करण्यात येत असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. हा अपमान कुणी एका महिलेचा नसून राज्यातील समस्त स्त्री वर्गाचा अपमान आहे असे आम्ही मानतो, असे राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

राज्यातील कोट्यवधी स्त्रियांचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी आम्हा खासदार-आमदारांवर आहे, असे आम्ही मानतो. त्यामुळे कुठल्याही स्त्रीची अवहेलना आम्ही कदापि सहन करणार नाही. महाराष्ट्राच्या स्त्री आदराच्या परंपरेला या समाजकंटकांमुळे आम्ही गालबोट लागू देणार नाही. वेळप्रसंगी दुर्गेचं रूप घेऊ, पण स्रीत्वाचा अपमान करणाऱ्यांविरोधात जोमाने लढू, असा निर्धार निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळात शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी, राष्ट्रवादाच्या खासदार वंदना चव्हाण, शिवसेना आमदार मनीषा कायंदे, ऋतुजा लटके, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, राष्ट्रवादीच्या आमदार अदिती तटकरे आदींचा समावेश होता.