
पोलीस पत्नी आंदोलनाच्या पवित्र्यात
मुंबई : पोलिसांच्या घाटकोपर येथील दक्षता हाउसिंग सोसायटीतील गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली स्लॅब कोसळण्याची मालिका अद्याप थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. काल आणि आजही पुन्हा राहत्या इमारतीतील स्लॅब कोसळले आहेत. त्यामुळे येथे राहत असलेल्या पोलीस पत्नी आता पालिका आणि म्हाडा कार्यालयावर आंदोलन करण्याचा तयारीत असल्याचे त्यांनी याबाबत बोलताना सांगितले.
घाटकोपर पूर्वेकडील रमाबाई आंबेडकर नगरात ही जवळपास २३ इमारतींची पोलीस वसाहत आहे. १९९६ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्घाटन क्केलेल्या या वसाहतीतील अनेक इमारती या गेल्या वर्षभरापासून मोडकळीस आलेल्या आहेत. गेल्या वर्षभरात येथील काही इमारतींचे तब्बल १० वेळा स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. काल आणि आजही येथील गणेश बिल्डिंग मधील रूम नंबर ८ मध्ये बाळासाहेब काकड यांच्या या रूम मधील स्लॅब कोसळले. विशेष म्हणजे काकड हे नुकतेच घराबाहेर पडले होते. तितक्यात काही क्षणात ही घटना घडल्याची महिती सोसायटीचे पदाधिकारी दशरथ आव्हाड यांनी दिली.
दरम्यान, येथील सर्व इमारती या मोडकळीस आल्याने त्यांवर योग्य कार्यवाही करावी यासाठी रहिवासी सतत पालिका आणि म्हाडा उपनिबंधक कार्यालयात हेलपाटे घालत आहेत. मात्र एकही यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत अद्याप ठोस पाऊले न उचलता हेतुता दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवासी करत आहेत. येथील रहिवशांच्या डोक्यावरील धोक्याची ही टांगती तलवार तातडीने बाजूला न केल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती येथील पोलीस पत्नींनी दिली.
१० अपघात, ३ जखमी
येथील अनेक इमारतींत गेल्या वर्षभरात झालेल्या स्लॅब कोसळण्याच्या १० घटनात ३ रहिवासी जखमी झाले आहेत. याबाबत पालिकेच्या घाटकोपर येथील एन विभाग कार्यालय आणि म्हाडाकडेही पाठपुरावा केला मात्र अधिकारी याकडे कानाडोळा करत आहेत. त्यामुळे सध्या सर्व रहिवासी धोक्याची टांगती तलवार घेऊन नाईलाजाने राहत आहेत अशी माहिती पोलिसांनी यावेळी बोलताना दिली आहे.


