spot_img

Mumbai : मालकाच्या घरावर नोकराचा डल्ला
२४ तासांत कांदिवली पोलिसांकडून अटक

मुंबई : आपल्या मालकाचा विश्वास संपादन करत लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने, काही सोन्याची नाणी, बिस्कीटे तसेच विदेशी कंपनीचे घड्याळ चोरी करणाऱ्या एका नोकराला कांदिवली पोलिसांनी २४ तासांत अटक केली आहे. विशेष म्हणजे हा नोकर बिहारला पळाला होता. श्रीकांत चिंतामणी यादव असे त्याचे नाव आहे.
यातील फिर्यादी हे महावीर नगर कांदिवली पश्चिम येथे राहतात. त्यांच्याकडे गेल्या १२ वर्षांपासून हाउस कीपिंग मॅनेजर म्हणून काम हा चोर काम करत होता. त्याने फिर्यादीच्या राहत्या घरातील कपाटाच्या बनावट चाव्या बनवून लॉकरमधून फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीच्या नकळत एकूण ४१ लाख ५० हजार किमतीचा हा मुद्देमाल चोरला होता. मात्र याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर कांदिवली पोलीस त्याच्या मागावर होते. कांदिवली पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत गीते, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजीत भिसे यांच्या पथकाने तांत्रिक तपास करत माहितीच्या आधारे आरोपी हा त्याच्या मूळ गावी गेल्याची माहिती मिळवली. त्यानंतर पोलिसांचे हे पथक यादव याच्या बिहार येथील सगदनिधी या मूळ गावी पोहोचले.येथील चंद्रमंडी पोलीस ठाण्याच्या मदतीने आरोपी श्रीकांतला अटक केली. दरम्यान, अटक आरोपीकडून रोकड, विविध कंपन्यांची महागडी घडाळे आणि कॅमेरे असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Explore our articles