
मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाइन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने पारंपरिक पद्धतीने अर्थात ऑफलाइन अर्ज भरण्यास मुभा दिली आहे. याशिवाय अर्ज भरण्याची मुदत अडीच तासांनी वाढविण्यात आली आहे. या निर्णयामुळे इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी २८ नोव्हेंबर २०२२ पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जात आहेत. मात्र, ऑनलाइन अर्ज भरण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. संकेतस्थळ हँग होणे, सर्व्हर डाऊन होणे अशा प्रकारच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यसह भाजपनेही उमेदवारी अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती.
निवडणूक आयोगाने आज ही मागणी मान्य केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच, अर्ज सादर करण्याची मुदत २ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत होती ती वाढवून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत करण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी आज दिली.