
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (Mumbai) मुंबईच्या फॅशन स्ट्रीट(Fashion Street) परिसरातील १० ते १२ दुकानांना आग लागल्याची माहिती समोर येत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथामिक माहिती आहे.
मुंबईतील(Mumbai) महत्त्वाचा आणि अत्यंत गजबजलेला परिसर असलेल्या फॅशन स्ट्रीट परिसरात शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. सुरूवातीला आग फक्त एकाच दुकानात लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केले. यानंतर परिसरातील १० ते १२ दुकानांना आगीने विळखा घातला.
एकाला लागून एक दुकाने असल्याने दुकानांतील कपड्यांनी काही क्षणात पेट घेतला. अचानक आग(fire) लागल्याने परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने हा परिसर तत्काळ निर्मनुष्य करण्यात आला, त्यामुळे आगीत जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. लागलेल्या आगीत कापड दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.