Mumbai : 9 अधीक्षकांच्या बदल्यांबाबत अधिकाऱ्यांत उलटसुलट चर्चा

0
191

मुकुंद लांडगे
मुंबई : राज्याच्या गृहविभागाने(home department) सोमवारी राज्यातील १०४ अधीक्षक-उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी दुपारी महासंचालक कार्यालयातून ९ जणांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली. तर, पुन्हा मंगळवारी रात्री उशिरा गृहविभागाने त्या अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्तीचे आदेश काढले. त्यामुळे याबाबत आता पोलीसदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांतून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या ९ जणांच्या बदल्या आधी विविध ठिकाणी झाल्या होत्या, तर नंतर त्या इतर ठिकाणी करण्यात आल्याने या चर्चेला पुष्टी मिळत असल्याचे एका अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले.

गृह विभागाने सोमवारी सायंकाळच्या सुमारास उपआयुक्त-अधीक्षक(Deputy Commissioner-Superintendent) दर्जाच्या १०४ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. मात्र, महासंचालक कार्यालयातून पुन्हा मंगळवारी दुपारी एक आदेश जारी करून त्यापैकी नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आल्याचे जारी करण्यात आले. तर, त्यानंतर त्याच रात्री उशिरा गृहविभागाने त्या नऊ अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्तीचे आदेश जारी केले. त्यामुळे राज्यकर्त्यांमध्ये एकमत नसल्याचे एकीकडे दिसून आले, तर दुसरीकडे यासाठी वशिल्याचा वासही येऊ लागल्याच्या प्रतिक्रिया वरिष्ठ अधिकाऱ्यांत व्यक्त होऊ लागल्या आहेत.

दरम्यान, गेल्या महिन्यातही असाच प्रकार घडला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमत नसल्याचे आरोप झाले होते. त्यावेळीही सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर त्यांना स्थगिती देत पुन्हा नवी नियुक्ती असे आदेश काढण्यात आले होते. आताही असे प्रकार झाल्याने याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

मंगळवारी रात्री उशिरा गृहविभागाने काढलेल्या नव्या आदेशानुसार, नम्रता पाटील यांची राज्य राखीव पोलीस बल(पुणे), दीपक देवराज यांची राज्य आर्थिक गुन्हे शाखा, सुनील लोखंडे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग(ठाणे), तिरुपती काकडे यांची नवी मुंबई, प्रकाश गायकवाड यांची मीरा-भाईंदर-वसई-विरार, श्वेता खेडकर यांची नागपूर शहर, संदीप डोईपह्डे यांची फोर्स १, तर धोंडोपंत एस. स्वामी यांची मुंबई परिमंडळ-८ येथून करण्यात आलेली बदली रद्द करण्यात आली आहे. प्रशांत मोहिते, योगेश चव्हाण यांच्या नव्या नियुक्तीचे(new appointment) आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत, तर किशोर काळे यांची अपर पोलीस अधीक्षक धुळे या पदावर नियुक्ती केल्याचे गृहविभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.