Mumbai : म्हाडातर्फे प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमधील 304 पात्र गाळेधारकांच्या सदनिकांची निश्चिती

0
343

दीपक पवार
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळातर्फे वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये पात्र गाळेधारकांना वितरित करावयाच्या ३०४ पुनर्वसन सदनिकांची(rehabilitation flats) संगणकीय प्रणालीद्वारे निश्चिती सोमवारी करण्यात आली. या पात्र गाळेधारकांना पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या व मालकी तत्वावर दिल्या जाणाऱ्या पुनर्वसन सदनिकेचा क्रमांक, इमारतीचा क्रमांक, इमारतीतील सदनिकेचा मजला आज निश्चित करण्यात आला.

वांद्रे(पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत वरळी येथील इमारत क्रमांक ३२, ३३, ३९, ४० मध्ये वास्तव्यास असणाऱ्या पात्र भाडेकरू/रहिवाशांना पुनर्विकासाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या पुनर्वसन इमारतींमध्ये मालकी तत्वावर मिळणाऱ्या सदनिकांचा क्रमांक यादृच्छिक(Randomised) पद्धतीने संगणकीय प्रणालीद्वारे(computerized system) सोमवारी निश्चित करण्यात आला.

या ४ इमारतींमध्ये एकूण ३२० गाळे/सदनिका आहेत. त्यापैकी ३०४ निवासी गाळे/सदनिका असून, १२ गाळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेला दिलेले आहेत. तर, ४ अनिवासी गाळे आहेत. प्रस्तावित पुनर्वसन इमारतींत आज सदनिका निश्चित करण्यात आलेल्या भाडेकरू/रहिवाशांची यादी म्हाडाच्या https://mhada.gov.in या वेबसाईटवर(website) प्रसिद्ध केली जाणार आहे.

यावेळी उच्चस्तरीय देखरेख समितीचे सदस्य जॉनी जोसेफ, राज्य सूचना व विज्ञान अधिकारी मोईज हुसैन अली, मुंबई विकास विभागाचे संचालक सतीश आंबावडे, कार्यकारी अभियंता प्रशांत धात्रक, उपमुख्य अधिकारी(बीडीडी प्रकल्प) राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. सावली इमारतीतील १८ गाळेधारकांची प्रस्तावित पुनर्वसन इमारतीमधील सदनिकांची निश्चिती काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प(The BDD Chawl Redevelopment Project) हा देशातील सर्वात मोठा नागरी पुनरुत्थान प्रकल्प असून, या प्रकल्पाची जबाबदारी शासनाने म्हाडाकडे सोपविली आहे.