
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : राज्यात मिंधे सरकारमुळे राज्याची सतत अवहेलना होत आहे. कोणीही यावे आणि टपली मारून जावे अशी स्थिती राज्याची झाली आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या पक्षाचा हा राजकीय कार्यक्रम आहे का?, असा सवाल उपस्थित करीत उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी सरकारवर सडकून टीका केली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(Bhagat Singh Koshyari) यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचाही समाचार त्यांनी घेतला. महाराष्ट्राला हिंमत, धमक काहीच नाही का? कोश्यारी यांनी छत्रपत्री शिवाजी महाराजांचा अपमान केल्यानंतर मुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
महाराष्ट्राची(Maharashtra) अवहेलना होत आहे. केंद्रातील सरकार विविध राज्यांमध्ये राज्यपालांची नेमणूक करते, मात्र राज्यपालांची नियुक्ती करताना त्या माणसांची कुवत काय असते हे तपासले जात नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
केंद्रात ज्यांच सरकार असतं त्यांची किंवा त्यांच्या विचारसरणीची लोकं राज्यपाल म्हणून नियुक्त केले जातात. मात्र, आता ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही त्यांना राज्यपालपदी नियुक्त केलं जातंय का?, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. राज्यपाल नियुक्तीचे निकषसुद्धा आता ठरविले पाहिजेत. राज्यपाल निपक्ष असायला हवेत. राज्यातील पेचप्रसंग सोडण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. मात्र, राज्यपाल जे बोलतात ते गांभीर्याने घेणे गरजेचं आहे. मात्र, राज्यपाल काहीही बोलतील, हे महाराष्ट्र मान्य करणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
राज्यपालांच्या(governor) सडक्या मेंदूच्या मागे कोण आहे? याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. कारण, महाराष्ट्रातील आदर्शांचा अपमान करुन महाराष्ट्रातील मनातील आदर्श पुसून टाकयाचे आणि आपले नेते किंवा त्यांचे आदर्श लोकांच्या मनात बिंबवण्याची चाल याचा निषेध केलाच पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, राज्यपालांनी शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. यामुळे आता फक्त निषेध करुन चालणार नाही. महाराष्ट्रद्रोह्यांना विरोध करण्यासाठी महाराष्ट्रप्रेमींनी एकत्र आले पाहिजे. सर्वांना मी एकत्र येण्याचे आवाहन करतो. महाराष्ट्रात एक राज्यव्यापी भूमिका घेण्याची गरज आहे. केंद्राने पाठविलेल्या या सॅम्पलला पुन्हा बोलवून घ्या किंवा एखाद्या वृद्धाश्रमात पाठवा. सध्या कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र ही कल्पनाही करता येत नाही.