
मुकुंद लांडगे
मुंबई : आता अशोक कुमार मिश्रा(Ashok Kumar Mishra) हे नवीन महाव्यवस्थापक पश्चिम रेल्वेच्या सेवेत दाखल झाले आहेत. केंद्राकडून पश्चिम रेल्वेला दुजाभावाची वागणूक मिळत असल्याने गेल्या ९ महिन्यापासून पश्चिम रेल्वेच्या सेवेत महाव्यवस्थापक नव्हते. मात्र, याबाबत माहिती अधिकारातून माहिती मिळवित केलेल्या तक्रारीमुळे अखेर आता हे पद भरण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. पश्चिम रेल्वेच्या(Western Railway) महाव्यवस्थापक पदाबाबत माहिती विचारत हे पद का भरले जात नाही याची विचारणा करण्यात आली होती, त्यानुसार पश्चिम रेल्वेचे उपमुख्य कर्मचारी अधिकारी रामप्रसाद बी. यांनी गलगली यांना माहिती दिली होती की, गेल्या १ फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक हे पद रिक्त आहे, तर येथे अप्पर महाव्यवस्थापक असलेले प्रकाश बुटानी यांच्याकडे हा पदभार देण्यात आला होता.

दरम्यान, या नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकरण रेल्वे बोर्ड असून, सक्षम प्राधिकारी यांच्या नावाची माहिती रेल्वे बोर्डाकडून घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे अनिल गलगली यांनी रेल्वे मंत्री(Railway Minister) आणि प्रशासनास पत्र पाठवून मागणी केली होती की, हे रिक्त पद तत्काळ भरावे, त्यानुसार आता या मागणीला यश आले आहे.


