
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (Mumbai) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी होम सेंटर असणार नाही. त्यासोबत कोरोनामुळे मागच्या वर्षीच्या दिलेला वाढीव वेळही रद्द करण्यात आला आहे, त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना वेळेच्या आतच पेपर लिहावा लागणार आहे. परीक्षेच्या नियमांत(examination rules) इतरही काही बदल करण्यात आले आहेत.
कोरोना काळात(Corona period) विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना होम सेंटर आणि पेपर लिहिण्यासाठी वाढीव वेळ दिला होता. ८० गुणांच्या पेपरसाठी दिलेला वाढीव अर्धा तास आणि ६० व ४० गुणांसाठी असलेली अधिकची पंधरा मिनिटांची सवलत यंदा होणाऱ्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणार नाही. मात्र, दिव्यागांना मिळणारी सवलत कायम राहणार आहे, असे औरंगाबाद बोर्डाने(Aurangabad Board) स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षी २५ टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला होता. मात्र, यंदा १०० टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होईल. सध्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. बारावीचे अर्ज भरण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत १ लाख ४८ हजार ६३६ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते.
दहावीसाठी २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत(deadline) असून, ९५ हजार ६८२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. यंदा परिस्थिती सुधारली असून, सर्व शाळा नियमित सुरळीत सुरू असल्याने देण्यात आलेल्या सुविधांची सूट रद्द करण्यात आली आहे.


