
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून अभूतपूर्व अशी ‘भारत जोडो यात्रा’ निघाली असून, या पदयात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पदयात्रेत सर्व जातीधर्मांचे लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत असून, जगानेही या पदयात्रेची दखल घेतली आहे. एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सभा ओस पडत असताना पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्ष व चंद्रशेखर बावनकुळेंची झोप उडाली आहे, म्हणूनच ते पदयात्रेवर अनावश्यक टीका करीत आहेत, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी लगावला आहे.
भाजप व चंद्रशेखर बावनकुळेंचा(Chandrashekhar Bawankule) समाचार घेताना नाना पटोले म्हणाले की, भारत जोडो यात्रा ही राजकीय फायद्यासाठी नाही तर देश, लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी आहे. केंद्रातील भाजप सरकार लोकशाही व संविधान धाब्यावर बसवून हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार करीत आहे. भाजपच्या या हुकूमशाही व मनमानी कारभाराला जनता कंटाळलेली आहे. महागाई, बरोजगारी, अर्थव्यवस्था या जनतेच्या मुख्य समस्यांवर भाजपकडे बोलण्यासारखे काहीही नाही, म्हणूनच या पक्षाचे नेते भारत जोडो यात्रेवर टीका करून आपले अपयश झाकण्याचा व जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस पक्षाचा व भारत जोडो यात्रेच्या नफ्या-तोट्याचा विचार करुन नये, काँग्रेस पक्ष(Congress party) त्यासाठी समर्थ आहे. काँग्रेसमुक्त भारत करणाऱ्याचे मनसुबे जनतेनेच उधळून लावले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून, त्यांच्या सभांना आता गर्दीही होत नाही, खुर्च्या रिकाम्या असतात, तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या पदयात्रेला जनतेचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारत जोडो यात्रा ही ऐतिहासिक परिवर्तन करणारी ठरेल असे देशातील वातावरण आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.