
प्रशांत बारसिंग
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून अश्लाघ्य विधान केल्याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार सोमवारी चांगलेच अडचणीत सापडले. राष्ट्रवादीने अब्दुल सत्तार यांचा २४ तासात राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे. राजीनामाच्या मागणीसाठी आग्रही असलेल्या राष्ट्रवादीच्या(NCP) संतप्त कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या शासकीय निवासस्थानावर दगडफेक करीत तीव्र निदर्शने केली. राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी सत्तार यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करीत कारवाईची मागणी केली आहे. आपल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटल्याचे लक्षात आल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी आपले शब्द मागे घेत माफी मागितली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी सत्तार यांच्या राजीनाम्यावर(resignation) ठाम राहिले.
मी कोणत्याही भगिनीबाबत अपशब्द बोललो नाही. मी जे बोललो, ते मला जे लोक बदनाम करतात त्यांच्याविषयी होते. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वक्तव्य करताना मी कोणत्याही महिलेचे मन दुखावेल, असा शब्द बोललोच नाही. पण माझ्या वक्तव्यामुळे कोणाचे मन दुखावले गेले असेल, तर मी खेद व्यक्त करतो. मी जे बोललो ते खोक्यांबद्दल बोललो, पण मी महिलांबद्दल बोललो असा अर्थ काढण्यात आला, अशी सारवासारव करीत अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी झाल्याप्रकाराबद्दल माफी मागितली.

शिर्डीत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या शिबिरात सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर टीका केली होती. ‘शिंदे गटातील आमदारांना ५० खोके मिळाले आहेत, म्हणूनच ते देण्याची भाषा करीत आहेत’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. यावर आज संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली. सुप्रिया सुळे यांचा एकेरी उल्लेख करीत सत्तार यांनी त्यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द उच्चारला. सत्तार यांचे ते विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली.

अब्दुल सत्तार यांच्या त्या विधानाचा निषेध करताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानाला लक्ष्य केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बाजूला अब्दुल सत्तार यांचे शासकीय निवासस्थान आहे. या निवासस्थानासमोर जमा होऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सत्तार यांचा तीव्र शब्दात निषेध करताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बंगल्यावर दगडफेक केली. या हल्ल्यात सत्तार यांच्या बंगल्याच्या काचा फुटल्या. कार्यकर्त्यांनी ‘५० खोके, माजलेत बोके’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. तसेच काही कार्यकर्त्यांनी बंगल्यावर चप्पलांचा हार फेकत निषेध व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी(the police) विद्या चव्हाण, मेहबूब शेख, सूरज चव्हाण आदींना ताब्यात घेतले.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अतिशय अर्वाच्य भाषेत करण्यात आलेली शिवीगाळ हा समस्त महिलावर्गाचा अपमान आहे. अब्दुल सत्तार यांच्या या विधानामुळे राज्यातील समस्त जनतेची मने दुखावली आहेत, त्यामुळे त्यांच्याविरोधात योग्य ते कलम लावून कारवाई करावी, अशी मागणी महेश तपासे(Mahesh Tapase) यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याला पत्र लिहून केली आहे.