Mumbai : बीडीडी रहिवाशांच्या शिष्टमंडळाने घेतली म्हाडा उपाध्यक्षाची भेट

0
152

दीपक पवार
मुंबई : बीडीडी(BDD) चाळींच्या विकासाला आता वेग प्राप्त झालेला असून, आता स्थानिक राशिवाशी यांच्या अडचणी दूर करण्यासाठी म्हाडा प्रशासन प्रयत्नशील आहे. असे असले, तरी सोमवारी अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीच्या शिष्टमंडळाने म्हाडा उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर आणि मुख्य अधिकारी अनिल बोरीकर यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. समितीने केलेल्या मागण्या मान्य केल्याचे आश्वासन म्हाडा उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी दिले आहे, अशी माहिती समितीच्या शिष्टमंडळाने दिली.

तसेच, व्यावसायिक गाळेधारकांना ३०० चौरस फूट क्षेत्रफळ द्यावे, ज्यांना व्यावसायिक गाळा नको अशा रहिवाशांना ५०० चौरस फूट निवासी घर द्यावे, तसेच स्थानिक बेरोजगारांना प्रकल्पात समाविष्ट करावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीच्या शिष्टमंडळाने म्हाडा(MHADA) उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर आणि मुख्य अधिकारी अनिल बोरीकर यांना दिले.

यावेळी शिष्टमंडळ आणि अधिकारी यांच्यात सविस्तर चर्चा झाली. या मागण्या मान्य करण्यात येतील, मात्र या बाबतचा अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री(Chief Minister) एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, लवकरच त्यांच्यासोबत एक बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन म्हाडा उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी समितीच्या शिष्टमंडळाला दिले. सोमवारी वांद्रे येथील म्हाडाच्या भवनातील ‘गुलजारीलाल नंदा’ सभागृहात बैठक पार पडली.

यावेळी समितीचे पदाधिकारी किरण माने, विजय प्रताप, भाई कांबळे, सत्यनारायण गजेंगि, रेणुका तांबे, मनाली सावंत, नीता सुर्वे, सुवर्णा गोंजारी, सुनीता काकडे, राजू गोणे, हेमंत शिंदे, जितेंद्र सरवणे उपस्थित होते.