Mumbai : 13 वर्षे फरार असलेल्या आरोपीस पोलिसांनी केली अटक

0
153

मुकुंद लांडगे
मुंबई : (Mumbai)
वडाळा(Wadala) येथील आर. ए. किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात पूर्वीच्या गुन्ह्यातील तब्बल १३ वर्षे न्यायालयात हजर न राहता फरार असलेला आरोपीस किडवाई मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. संतोष नाथा कांबळे असे त्याचे नाव असून, तो याच भागातील जय शिवाजीनगर झोपडपट्टीत राहत होता.

आरोपी हा त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांत न्यायालयात हजर राहत नसल्याने दादर येथील न्यायालयाने त्याला विहित प्रक्रियेद्वारे ‘फरार’ घोषित केले होते. मात्र, त्याआधी त्याला गुन्ह्यांत अटक होऊन जामीन मिळाल्यावर तो परागंदा झाला होता. विशेष म्हणजे पोलीस ठाण्याच्या(police station) अभिलेखावर त्याचे छायाचित्र उपलब्ध नव्हते, तसेच त्याच्या मूळ गावाबाबतही पोलिसांना फारशी माहिती उपलब्ध नव्हती, त्यामुळे त्याचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. अखेर फरार पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखडे आणि त्यांच्या पथकाने आरोपीच्या खटल्याचा बारकाईने अभ्यास करून त्याचे मूळगाव शोधून काढत त्याला सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथून ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, अटकेपासून वाचण्यासाठी आरोपी मोबाईल फोन वापरत नव्हता. तर, दुसरीकडे तो करीत असलेला पूर्वीचा वायरमनचा(wireman) व्यवसाय बदलून आता बसवर क्लीनर म्हणून काम करीत होता. ही कामगिरी परिमंडळ-४ चे नव्यानेच पदभार घेतलेले पोलीस उपआयुक्त डॉ. प्रवीण मुंढे, तसेच माटुंगा विभागाचे नूतन सहायक आयुक्त संजय जगताप आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमूद कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महेश लामखडे यांच्यासह अंमलदार नारायण कदम, सुरेश कडलग, रवींद्र साबळे, दळवी, बनकर आणि महिला पोलीस यादव यांनी केली.